आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Potientality Use For Real Image, F.M.Shinde Remark

प्रतिभेचा वापर ख-यासाठी करावा,साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदेंचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - साहित्यिकांकडे शब्दांचे लाघव व वेगळी शैली असते; पण या प्रतिभेच्या आधारे त्यांनी लबाडी लपवून लेखन करता कामा नये. आपल्यापेक्षा काहीही न लिहिणारी माणसेच अधिक खरी असतात, ही जाणीव साहित्यिकांनी ठेवावी आणि आपल्या प्रतिभेचा वापर खरं बोलण्यासाठी करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विनोदी कवी तसेच सासवड येथे होणा-या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी शुक्रवारी केले.
भाऊसाहेब फिरोदिया माजी विद्यार्थी संघ, अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ व महाराष्टÑ साहित्य परिषदेची नगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख अध्यक्षस्थानी होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, लीलाताई शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, मी एकटा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नाही. हा मान समाजातील प्रत्येकाचा आहे. माझी आई, पत्नीच्या रूपातील आई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात दिसणारी सामाजिक आई अशा सर्व जन्मदात्यांना हा सन्मान मी अर्पण केलेला आहे. लोक मला विनोदी कवी म्हणतात; पण गांभीर्याची गंगोत्री ही गमतीतूनच निघते.
कारण, ज्याला आपण विनोद म्हणतो, खरे तर त्यासारखे दुसरे गांभीर्य कोणतेच नसते, असे मला वाटते, असे फ. मुं. यांनी सांगितले.यशवंतराव गडाख म्हणाले, फ. मुं. च्या कवितेत उपहास असला, तरी त्याने कोणाला जखम होणार नाही, याची काळजी ते घेतात. ग्रामीण महाराष्‍ट्रात त्यांनी अनेक साहित्यिक घडवले. म्हणूनच ते निर्विवाद अध्यक्ष झाले आहेत. पोपटराव पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक योगेश अनासपुरे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव तनपुरे यांनी केले. जिल्हा बँकेतर्फेही फ. मुं. चा गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नेत्रदान चळवळीविषयी माहिती दिली.
‘पवार’ जातीलच कसे?
एकाने मला विचारले, अंतुले ‘सिमेंट’मुळे गेले, निलंगेकर ‘मार्कां’मुळे गेले, मग (शरद) पवार कसे जाणार? कोंडीत पकडणारा हा प्रश्न ऐकून मीही प्रतिप्रश्न केला की, ‘पण, पवार जातीलच कसे?’ यावर चांगलाच हशा पिकला.