आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Power Problem In Ahmednagar, Latest News In Divya Marathi

सावेडी उपकेंद्र रखडले; नगरचा वीजप्रश्न गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-महावितरणने मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारच्या द्रूतगती विकास कार्यक्रमांतर्गत (आर-एपीडीआरपी) शहरात विविध विकासकामे केली. मात्र, सावेडी उपकेंद्रासाठी महावितरणची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. शहरातून सर्वाधिक महसूल देणार्‍या सावेडीतील उपकेंद्र अधिकार्‍यांच्या पाठपुराव्याअभावी रेंगाळले आहे. उपकेंद्रासाठी आता जी जागा प्रस्तावित आहे, त्या जागेची फाईल महावितरणच्या मुंबईतील मुख्य कार्यालय असलेल्या ‘प्रकाशगडा’वर धूळखात पडून आहे.
‘आर-एपीडीआरपी’ योजनेंतर्गत शहरात नवीन रोहित्र बसवण्यात आले, जुन्या रोहित्रांची क्षमता वाढवण्यात आली, नवीन वीजवाहिन्या झाल्या, केडगाव पॉवर हाऊस येथे उपकेंद्र झाले. गुलमोहोर, पाइपलाइन, मनमाड रस्ता, औरंगाबाद रस्ता, सावेडी, सिव्हिल या परिसरात झपाट्याने शहर वाढत आहे. त्यामुळे या परिसरात विजेची मागणीही वाढत आहे. यामुळे या परिसरात नेहमी विजेची समस्या निर्माण होते. शहराच्या मध्यवर्ती उपकेंद्रासाठी महावितरणने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी उपकेंद्रासाठी प्रभात बेकरीमागील सुमारे 93 गुंठे असलेला खासगी भूखंड आरक्षित केला होता. मात्र, या भूखंडाचे मोक्याचे स्थान पाहून भविष्यात हा भूखंड ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ ठरेल हे हेरून मनपातील काही बहाद्दरांनी या भूखंडाची कागदपत्रे गहाळ केली. कागदपत्रे उपलब्ध नसल्याने महावितरणला हा भूखंड घेण्यात अडचणी आल्या. या भूखंडापैकी 30 गुंठेच जागा महावितरणला उपकेंद्रासाठी हवी होती.
अखेर तत्कालीन अधीक्षक अभियंता शिवाजी चाफेकरंडे यांनी जुलै 2012 मध्ये हुंडेकरी लॉनच्या मागे सावेडी उपकेंद्रासाठी जागा निश्चित केली. त्या जागेची पाहणी नाशिक येथील अधिकार्‍यांनी पाहणी केली होती. मात्र, त्या जागेला वरिष्ठांनी ‘रेड सिग्नल’ दिला. आता पुन्हा महावितरणने सावेडी गावाजवळ उपकेंद्रासाठी जागा निश्चित केली आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करून ती फाईल महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालय असलेल्या ‘प्रकाशगडा’वर पाठवली. दोन-अडीच महिन्यांपासून फाइल तेथेच पडून आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे, एवढेच सांगितले.