आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकारणासाठी राजकारणाची आवश्यकता नाही, प्रशांत गडाख यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समाजकारणाच्या शिकवणीचा वारसा मला वडील यशवंतराव गडाख यांच्यापासून मिळाला आहे. समाजकारणासाठी राजकारणाची आवश्यकता असतेच असे नाही, अशी त्यांची शिकवण आहे. त्यांच्या शिकवणीनुसार मला राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे वाटते. यापुढेही माझे समाजकारण जोमाने सुरू राहील, असे प्रतिपादन विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रशांत गडाख यांनी नुकतेच केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राला मान्यता मिळाल्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ, भाऊसाहेब फिरोदिया माजी विद्यार्थी संघ व प्रशांत गडाख मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी ते त्यांच्या निवासस्थानी बोलत होते. यावेळी संजय मोरे, संजय भिंगारदिवे, प्रशांत गर्जे, भाऊसाहेब पांडुळे, शंकर पवार, राहुल टाकळकर, दीपक परदेशी, उमेश गावडे, अशोक टेकाडे, जयदीप पवार, घनश्याम देशपांडे, रवी पातारे, विजय शिपणकर, सुनील म्हस्के, धर्मा करांडे आदी उपस्थित होते.
गडाख म्हणाले, राजकारणापेक्षाही समाजकारणाचा पाया भक्कम असतो. असे संस्कार मला आई-वडिलांनी दिले. प्रशालेत अणि महाविद्यालयात असताना मोठेपणाची हवा कधी डोक्यात घुसू दिली नाही. जीवनात मी अवघ्या दोन वेळा निवडणूक लढवली. पहिली प्रशालेत असताना मित्रांच्या आग्रहाखातर वर्गप्रमुखाची आणि दुसरी सिनेट सदस्यत्वाची. मला समाजकारण करताना कधी राजकारणाची गरज पडली नाही. समाजकारणातच मला रूची आहे. त्यातूनच वृक्षलागवड, नेत्रदानासारखे संकल्प आपल्यासारख्या सर्वांच्या मदतीने मी पुढे चालवत आहे. सिनेट निवडणूक लढवणारा सर्वात लहान वयाचा मी होतो. मी संस्थाचालकांचे प्रतिनिधीत्व असणाऱ्या विभागातून निवडणूक लढवत होतो. निवडून येण्याबाबत बहुतांशी सर्वचजण साशंक होते. तीन जिल्ह्यांतील संस्थाप्रमुख माझे मतदार होते.
यशवंतराव गडाखांनी लिहिलेले "अर्धविराम' पुस्तक मी मतदारांपर्यंत आधीच पोहोचवले होते. ज्यावेळी मी मतदारांकडे जात होतो, त्यावेळी ते सर्वजण आम्ही पुस्तक वाचले आहे. खूप सुंदर आहे. तुम्हाला खूप मोठा संस्काराचा वारसा मिळाला, असे सांगत. त्यावेळी मला "दिवार' सिनेमातील तो "मेरे पास....' हा संवाद आठवत असे. त्यांच्या सांस्कृतिक वारशानेच मला सिनेटमध्ये विजय मिळाला, असेही गडाख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
माझा खारीचा वाटा
नगरला उपकेंद्र व्हावे, यासाठी मी माझ्या पद्धतीने खारीचा वाटा उचलला. बाबुर्डी घुमटचे ग्रामस्थ, माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्ह्यातील मंत्री, सर्व पक्षीय नेते, कुलगुरू वासुदेव गाडे, माजी कुलगुरू नरेंद्र जाधव, प्राध्यापक, सिनेट सदस्य यांनी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोलाचा वाटा उचलला. भविष्यात या ठिकाणी १५० ते २०० कोटी खर्चाच्या सुंदर वास्तू उभ्या राहतील. विद्यापीठाच्या इमारतीसारखी वास्तू नगरला उभी रहावी, असा विचार आम्ही कुलगुरुंजवळ मांडला आहे, असे गडाख यांनी यावेळी सांिगतले.