आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dhakane News In Marathi, BJP, Congress, Pathardi, Divya Marathi

रामाचे नाव घेणार्‍या भाजपात तप व्यर्थ, प्रताप ढाकणे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवरून आक्षेप घेऊन भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार्‍या अँड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी सर्मथकांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. बारा वर्षे भाजपची कार्यपद्धती जवळून पाहिली. रामाच्या नावाने चालणार्‍या पक्षात एक तप व्यर्थ गेले. आता शरद पवारांच्या सान्निध्यामुळे वनवास संपणार आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.


संस्कार भवनात ढाकणे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी शरद पवार यांच्या नियोजित पाथर्डी दौर्‍यात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले, भाजपमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांपुढे अडचणी वाढवण्याचे काम चालू आहे. माजी जिल्हाध्यक्ष तुळशीराम मुळे, विठ्ठल लंघे अशा अनेकांनी यापूर्वी पक्षाला रामराम ठोकला. ओढा आणि पाडा या नीतीत दंग पक्षात घुसमट झाली. कार्यकर्त्यांना न्याय व प्रश्नांची तड लावण्यासाठी पूर्ण विचाराअंती पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा कांगावा होत असला, तरी खरा निर्णय वेगळाच होणार आहे. शरद पवार हेच उत्तम नेतृत्व करून देश व राज्याला महासत्ता बनवू शकतात. त्यामुळेच आपण अनेकांचे निमंत्रण धुडकावून राष्ट्रवादीला पसंती दिली. मंगळवारी वीर सावरकर मैदानावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.


केदारेश्वरला सहकार्य व आमदारकीची अट
अँड. प्रताप ढाकणे यांनी मधल्या काळात शरद पवार यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. केदारेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य व विधान परिषदेचे प्रतिनिधित्व व कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग या प्रमुख अटी त्यांनी राष्ट्रवादीपुढे ठेवल्या. पक्षश्रेष्ठींनी चर्चा यशस्वी झाल्याचे संकेत दिल्यानंतर ढाकणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.