आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratap Dhakane News In Marathi, Nationalist Congress, BJP, Nagar

प्रताप ढाकणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले प्रताप ढाकणे यांनी अखेर राष्ट्रवादीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे. पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासोबतच त्यांचे उमेदवार राजीव राजळे यांना ढाकणे यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.


गांधींच्या उमेदवारीला विरोध करत ढाकणे यांनी बंडाचे निशाण फडकवले. उमेदवार बदलाच्या मागणीकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. गेली बारा वष्रे ते भाजपमध्ये सक्रिय होते. गांधी यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पक्ष सोडून जाण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट करतानाच विविध पक्षांकडून ऑफर असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. मात्र, शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार होते. त्यांचा प्रभाव असणार्‍या पाथर्डी तालुक्यात वंजारी समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. ढाकणेंसोबत तो राष्ट्रवादीशी जोडला जाण्याची शक्यता आहे. त्यांचे वडील व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना मानणारा मतदार पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात अधिक आहे. गेल्या एक तपापासून ते राजकारणापासून अलिप्त आहेत.


गेल्या लोकसभा निवडणुकीत पाथर्डीत मेळावा घेऊन गांधींना दिलेला पाठिंबा वगळता ते राजकारणापासून दूरच आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रताप ढाकणे यांचा प्रचार करण्याऐवजी त्यांनी तटस्थ राहणेच पसंत केले होते. ‘केदारेश्वर’ला यावर्षीचा गाळप परवाना मिळावा यासाठी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलन केले. ‘केदारेश्वर’च्या आंदोलनात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. या वेळी ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ढाकणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे केदारेश्वर कारखाना सुरू राहण्यासाठी राष्ट्रवादीची मदत, तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा शब्द मिळाल्याची खात्रीलायक माहिती आहे.


यासंदर्भात ढाकणे यांच्या पक्षप्रवेशासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 25 मार्चला पाथर्डीत होत असलेल्या मेळाव्यातच भूमिका स्पष्ट होणार आहे. पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात भाजपला नेताच उरला नसल्याचे सध्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य मिळवण्यासाठी खासदार गांधी यांना चांगलीच धावाधाव करावी लागणार आहे.


पत्रकार परिषद घेऊन बोलू
भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांच्यांशी संपर्क साधता असता त्यांनी ‘पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर बोलू’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. डॅमेज कंट्रोलसाठी भाजपकडून तातडीने प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. प्रदेश समितीकडून यापूर्वी करण्यात आलेले प्रयत्न तोकडे पडले होते.


शिवसेनेचा उमेदवार आज
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बबन घोलप यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यात अडचण आली आहे. त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यात येणार आहे. यासंदर्भात मुंबईत खल सुरू आहे. घोलप यांचे चिरंजीव, प्रेमानंद रूपवते, माजी आमदार सदांनद लोखंडे, लहू कानडे यांच्या नावाची चर्चा आहे. 24 मार्चला उमेदवार घोषित होणार आहे.

‘अर्बन’चीच चर्चा अधिक
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने खासदार गांधी यांच्यावर अर्बन बँकेतील गैरव्यवहारावरून आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारही त्याला अपवाद ठरले नाहीत. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर सहकार निबंधकांनी केलेल्या कारवाईला मार्च 2011 व जून 2013 मध्ये स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवून राजकीय लाभ घेण्याची खेळी होऊ शकते, अशी चर्चाही सध्या सुरू आहे.

योग्य वेळी बोलेन
शिवसेना आमदार अनिल राठोड हे खासदार गांधी यांच्या प्रचारात सक्रिय होणार का? याबाबत अजूनही संभ्रम आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी महायुतीच्या मेळाव्यात आमदार राठोड लवकरच प्रचारात सक्रिय होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, राठोड अजूनही प्रचारापासून दूर आहेत. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ शी बोलताना राठोड म्हणाले, ‘सध्या तरी महायुतीचा प्रचार करणार आहे. मात्र, गांधी यांच्या प्रचाराबाबत योग्य वेळी बोलेन.’

मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते अशी प्रताप ढाकणे यांची ओळख होती, तर माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे हे पूर्वी बीड मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. मुंडेंना शह देण्याचा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासून प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीने मुंडे यांच्या घरातच बंडाळीचा सुरुंग लावला होता. ढाकणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामागे हेच गणित असल्याची चर्चा आहे. ढाकणे यांच्यामुळे बीड मतदारसंघातही फायदा होण्याचे गणित मांडले जात आहे.