पाथर्डी- भाजपला बहुजनांची फक्त मते लागतात. बहुजनांना काही देण्याची वेळ आली की, त्यांना त्यांच्याच वर्तुळातील गोतावळा हवा असतो. पाशा पटेल, पांडुरंग फुंडकर, प्रकाश शेंडगे अशी उपेक्षितांची यादी दिवसगणिक वाढत जाणार आहे. भाजपचा फसवा चेहरा जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केली.
टाकळीमानूर येथे आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष भीमराव फुंदे, चंद्रकांत म्हस्के, बाळासाहेब ताठे, जि. प. सदस्य उज्ज्वला शिरसाठ, अमोल बडे आदी उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, भाजपकडून केवळ
आपलीच नाही, तर गोपीनाथ मुंडे यांचीही फसवणूक झाली. पक्षाचा हा फसवा चेहरा उघड झाल्याशिवाय राहणार नाही. राजळेंना कमळाच्या नावावर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. ग्रामपंचायतीपासून खासदारकी माझ्या कुटुंबातच पाहिजे, हा त्यांचा आग्रह पक्ष संपवायला कारणीभूत ठरला. बरोबरची माणसे वापरून घ्यायची, कोणी मोठे होऊ नये म्हणून कपटनीती करायची, असा त्यांचा कार्यक्रम आहे. ज्यांनी उपकार केले त्यांनाच राजळेंनी संपवले.
बबनराव ढाकणेंनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. तीच शिकवण कार्यकर्ते पाळत राहिले. त्यांनाही लाचार करण्याचा प्रयत्न झाला. ज्या लाखो लोकांनी तुम्हाला लोकसभेत मते दिली, त्यांना गेल्या चार महिन्यांपासून भेटायला तुम्हाला वेळ नाही. मुंडेंच्या शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करायला वेळ नाही. एखादा फ्लेक्स, एखादी जाहिरात त्यांच्यासाठी द्यावीशी वाटली नाही. ज्या पक्षाने व नेत्याने लोकसभेची उमेदवारी दिली, त्यांचे फोन घ्यायला, भेटायला तुम्हाला वेळ नाही. अचानक असे काय घडले, आपण कमळाचे चिन्ह घेऊन मते मागायला निघालात, अशी टीका ढाकणे यांनी राजळे यांच्यावर केली.
अशा पाताळयंत्रींना मते देणार का?
जि. प. सदस्य उज्ज्वला शिरसाठ यांची सभापतिपदी निवड निश्चित होती. पण आमदार चंद्रशेखर घुले यांना अडचणीत आणण्यासाठी राजीव राजळे यांनी नेवाशाच्या सोयऱ्याला हाताशी धरून ऐनवेळी गोंधळ घातला. एवढा पाताळयंत्रीपणा करणाऱ्यांना मते देणार का, असा सवाल ढाकणे यांनी मतदारांना केला.