शिर्डी | प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील मळीचा (मोलॅसिस) टँक फुटून तिघांचा मृत्यू झाला. यात १४ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. शशिकांत पगारे (५२), बाळू देवरे (५६), विनोद जोंधळे (६०) अशी मृतांची नावे आहेत.
यातील सहायक चीफ केमिस्ट जोंधळे यांचा घटनेच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रवरा हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका व खासगी वाहनातून जखमींना प्रवरा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. शशिकांत पगारे, बाळू देवरे, विनोद जोंधळे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. विजय चेचरे व शकील अजीम शेख यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
रामदास पवार, मोहन वदक, नीलेश धावने, राजेश मकासरे, नवनाथ विखे, संदीप देवकर, दामोधर घाडगे, भिका गागरे, नितीन तांबे, बाबू यादव, बाळासाहेब अंत्रे, नानासाहेब गाडेकर, रावसाहेब जोंधळे हे कामगार मदत करताना जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत व जखमींना सर्वतोपरी मदत
कारखाना कामगारांच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहे. मोलॅसिस टँक लीक असल्याचे लक्षात आल्याने काही कामगार त्याची दुरुस्ती करीत होते. परंतु त्याचवेळी टाकी फुटली व ही दुर्दैवी घटना घडली. कारखान्याचा हा टँक सर्वाधिक क्षमतेचा आहे. त्यातील मोलॅसिस थंड पाण्यात मिसळल्याने कारखाना तत्काळ बंद करण्यात आला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून गणेश कारखान्यात उर्वरित गाळप सुरू करण्यात आले. घटनेच्या चौकशीला कारखाना सहकार्य करील. मृत व जखमी कामगारांच्या कुटुंबीयांना कारखाना सर्वोतोपरी मदत देईल.
राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते.
जखमींवर तातडिने उपचार
घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झालो. कामगारांना उपचाराची व्यवस्था केली. रुग्णालयात जाऊन् कुटुंबीयांना धीर दिला. या घटनेमुळे ८ एप्रिल रोजी होणारा गळीत हंगामाचा समारोप समारंभ रद्द केला.
-डॉ. सुजय विखे, अध्यक्ष, विखे पाटील कारखाना, प्रवरानगर.