आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर - प्रवरा नदीवरील पुलाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. या पुलाच्या मंजुरीवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी पुलाची परवानगी नाकारल्याचे पत्र दाखवण्याचे आव्हान संगमनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी काँग्रेसला दिले आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेतील ‘र्शेयवाद’ पुन्हा उफाळून आला. र्शेयाच्या या लढाईत पुलाच्या कामाला कधी सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगमनेर शहरातून नाशिक-पुणे महामार्ग जातो. या महामार्गावरील प्रवरा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाने शंभरी ओलांडली आहे. सध्या हा पूल शेवटच्या घटका मोजत असून वाहतुकीसाठी तो धोकादायक बनला आहे. या अरुंद पुलावरून वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने पुलावर अपघातांचे मोठे प्रमाण वाढत आहे. या अपघातात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. पुलावरून मोठी वाहने गेल्यास त्याला हादरे बसतात. पादचार्यांना, सायकलस्वारांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.
पुलाचे लोखंडी कठडे तुटल्याने हा पूल आणखी धोकादायक बनला आहे. मात्र, या पुलाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग खात्याच्या अधिकार्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. प्रसारमाध्यमांनी याकडे लक्ष वेधल्यानंतर अधिकार्यांनी तात्पुरती दुरुस्ती करण्यास प्राधान्य दिले. मात्र, या पुलावरील धोका अद्याप टळलेला नाही. नव्याने पूल बांधण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नंतर याप्रश्नी लक्ष घातले. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. सध्या पुलाची दुरुस्ती करून त्यालगत नवा पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी केंद्राकडून 10 कोटी 27 लाखांचा निधी मंजूर झाला. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीतून यासंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देत आपल्या प्रयत्नांतून हा निधी मिळाल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून काँग्रेसचे सरचिटणीस कैलास पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. थोरात यांचा सततचा पाठपुरावा व वैयक्तिक संबंधामुळे या पुलाला हा निधी मंजूर झाल्याचे त्यात म्हटले आहे. खासदार वाकचौरे यांचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने फेटाळल्याचे सांगत ते न केलेल्या कामाचे र्शेय घेत असल्याची टीकाही यामध्ये करण्यात आली आहे.
पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याने पुलाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक पत्रक प्रसार माध्यमांकडे पाठवत हा प्रश्न केवळ खासदार वाकचौरे यांच्यामुळेच मार्गी लागल्याचे म्हटले आहे. महसूलमंत्र्यांनी केलेले प्रयत्न व पुलाचा वाकचौरे यांचा प्रस्ताव धुडकावल्याचे केंद्रीय भूपृष्ठ खात्याचे पत्र दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. त्यामुळे पुलाच्या वादात आणखी भर पडली असून थोरात-वाकचौरेंच्या र्शेयवादात पुलाचे काम मात्र रखडले असून हे काम सुरू करावे,अशी मागणी होत आहे.
खोट्या मजकुराबाबत हक्कभंग आणू : कुटे
पुलाच्या मंजुरीबाबत वाकचौरे यांच्याकडील अंतिम पत्राचा क्रमांक एन. एच. 6-12014/ 55 / 2011 , 7 जानेवारी 2013 असा असून त्यावर एस. सदानंद बाबू (सुपरीटेंडिंग इंजिनिअर) यांची सही आहे. मात्र, पानसरे यांनी हे काम तीन महिन्यांपूर्वी मंजूर झाल्याचे सांगत स्वत:चे हसे करून घेतले आहे. त्यामुळे ते व त्यांचे नेते प्रसिध्दीसाठी हपापले आहेत. या पुलाच्या पुनर्बांधणीचा कोणताही प्रस्ताव नव्हता. मात्र, वाकचौरे यांनी त्यासाठी वेळोवेळी आग्रह धरला. पानसरे यांनी नकाराच्या मंजुरीचे पत्र दाखवावे; अन्यथा खासदारांच्या मदतीने खोट्या मजकुराबद्दल हक्कभंग आणायला भाग पाडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.