आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडीत गरोदर मातांना मिळतो आहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील लालटाकी भागातील सिद्धार्थनगर येथे गरोदर महिलांना दुपारचे एक वेळचे जेवण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती नागरी विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली.

एकात्मिक बालविकास प्रकल्प एक अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेच्या निधीतून हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले असून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सिद्धार्थनगर येथील वस्तीत राहणार्‍या कष्टकरी महिलांना गरोदरपणात स्वत:ची काळजी घेणे, वेळेवर सकस आहार घेणे शक्य होत नसल्यामुळे त्यांची बालके कमी वजनाची असतात. जन्मत:च कमी वजन असलेल्या या बालकांना पुढे कुपोषणाचा सामना करावा लागतो.

यावर उपाय म्हणून प्रायोगिक तत्वावर गेल्या तीन-चार महिन्यांपासून सिद्धार्थनगर येथील लालटाकी भागातील काही अंगणवाड्यांमध्ये 100 गरोदर महिलांना वरणभात, भाजीपोळी, लापशी, फळे, तसेच लोह असलेल्या गोळ्या दिल्या जात आहेत. या व्यतिरिक्त लसीकरण, गरोदरपणातील काळजी, बालसंगोपन यांचे प्रशिक्षण व सल्ला मार्गदर्शन आदी उपक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा पवार राबवत आहेत. हा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम असून याला परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.