आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाईन डे: गुलाबाच्याही नकळत वारा घेऊन पळतो सुगंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘गुलाबाच्या ही नकळत त्याचा सुगंध
उनाड स्वच्छंदी वारा घेऊन पळतो
निसर्गापरी आयुष्यही किती सुंदर आहे
अर्थ याचा या गुलाबांकडे पाहिल्यावर कळतो..’
असा संदेश असलेली अनेक शुभेच्छापत्रे शहरातील विविध दुकानांमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात प्रेम दिवसाच्या पार्श्वभूमीवर आली आहेत.‘व्हॅलेंटाईन डे’ 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला विविध भेटवस्तू तसेच शुभेच्छा संदेश दिला जातो. महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये या दिवसाची विशेष क्रेझ आहे. या दिवसानिमित्त तरुणाईकडून मराठी शुभेच्छापत्रांना पसंती दिली जात आहे.


फेब्रुवारी महिन्यामध्ये महाविद्यालयात विविध ‘डे’ची धूम असते. तरुण व तरुणी या दिवसांची आतुरतेने वाट पहात असतात. तरुणाईसाठी हा महिना एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो. 7 फेब्रुवारी रोझ डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे साजरे झाले. यानंतर आता तरुणाई वाट पहात आहे ती, 14 फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंनटाईन डे’ची. या दिवसाला प्रेम दिवसही म्हटले जाते. यानिमित्त तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करते. या दिवसानिमित्त काय भेटवस्तू द्यायची, कशी आणि कुठे द्यायची याचे प्लॅनिंग पंधरा दिवसांपासून कॉलेजकट्टय़ांवर बसून सुरू आहे. त्याबरोबरच विवाहित दाम्पत्य देखील एकमेकांना या दिवसाची खास भेट देतात. या पार्श्वभूमीवर शहरातील आर्चिज् गॅलरी, तसेच विविध लहान-मोठय़ा दुकानांमध्ये भेटवस्तू उपलब्ध आहेत. कॉलेजमधून मिळालेल्या फावल्या वेळात या दुकानांमध्ये भेटवस्तू खरेदीसाठी तरुणाईची गर्दी वाढत आहे. गॅलरीत टेडी बिअर, कपल्स स्टॅच्यू, फोटो फ्रेम, प्रेम संदेश देण्यासाठी लव चॉकलेट, हृदयाच्या आकारातील बास्केट या भेटवस्तू उपलब्ध आहेत. तसेच इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील प्रेमपत्रे व शुभेच्छा संदेश उपलब्ध असून त्याच्या किमती 50 रुपयांपासून 3 हजारांपर्यंत आहेत. मनातील भावना शुभेच्छापत्रांवर मायबोली भाषेत छापील असल्याने या पत्रांना विशेष पसंती मिळत आहे. शुभेच्छा पत्रांच्या किमती त्याच्या आकारानुसार असून दोन फुटांपर्यंत ही पत्रे उपलब्ध आहेत.


15 टक्के भाववाढ
तरुणाईकडून मराठी ग्रीटिंग्जला जास्त मागणी आहे. त्यामुळे विविध आकारांतील व विविध प्रेम संदेश लिहिलेली ग्रीटिंग्ज उपलब्ध झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत भेटवस्तू, तसेच शुभेच्छापत्रांच्या दरात 15 टक्के वाढ झाली आहे. 13 फेब्रुवारीला खरेदीसाठी तरुणांची मोठी गर्दी होईल.’’ मिलिंद कुलकर्णी, संचालक, आर्चिज् गॅलरी.


टॉकिंग फ्लॉवर प्रथमच शहरात
व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रथमच टॉकिंग फ्लॉवर उपलब्ध आहे. यात गुलाबासह इतर फुलांवर संदेश छापून मिळेल. ऑर्डर दिल्यानंतर काही तासांमध्ये हवा तो संदेश लिहिलेली फुले उपलब्ध होतात. एका फुलाची किंमत 80 ते 100 रुपये आहे. यासाठीची यंत्रणा कोरियाहून उपलब्ध केली.’’ सचिन भुतारे, फ्लॉवर डेकोरेटर.

भेटवस्तू व किमती
भेटवस्तू किमती (रुपयांत)
टेडी बिअर 70 ते 1800
फोटो फ्रेम 45 ते 1500
बास्केट 45 ते 499
ग्रीटिंग 5 ते 895
कॅन्डल 50 ते 180

वर्षभर विविध सण तसेच उत्सवानिमित्त गुलाबाला मागणी असते. पण, नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात गुलाबाचे भाव वधारतात. दोन दिवसांपूर्वी प्रति गुलाबाचा दर 5 ते 10 रुपये होता. सध्या 15 रुपये असून ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी एका गुलाबाची किंमत 25 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.