आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पदवीधर’ची जागा पुन्हा खेचून आणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील वीस वर्षांपासून विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य होते. सध्या या मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार आहे. आगामी निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
बीडला जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर महाजन यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, नाशिक पदवीधर निवडणुकीचे नोंदणीप्रमुख अॅड. युवराज पोटे, माजी नगरसेवक सचिन पारखी, बाळासाहेब पोटघन, दादासाहेब बोठे, अशोक गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

महाजन म्हणाले, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदार सुशिक्षित असून, भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे. त्यामुळेच मागील २० वर्षे या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य राहिले होते. माजी आमदार प्रताप सोनवणे यांच्या रूपाने हा मतदारसंघ भाजपचा हक्काचा राहिला. पदवीधर मतदारसंघाचा आमदार कसा असतो, हे त्यांनी दाखवून दिले.

सध्याचे विरोधी आमदार हे संस्थानिक आहेत. संस्था चालवल्यासारखे ते आमदार म्हणून वावरत आहेत. सर्वसामान्यांना त्यांची भेट मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय आमदाराला त्यांची जागा दाखवून देऊन या मतदारसंघावर पुन्हा प्राबल्य मिळवा, असे ते म्हणाले.

मी देखील याच मतदारसंघातील आहे. या निवडणुकीत सर्व ताकद आपण देऊ. मतदारसंघात भाजपचा एक केंद्रीय दोन राज्याचे मंत्री, खासदार असून २० आमदार आहेत. एवढी मोठी ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपला सोपी जाणार आहे. नगर जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण मला माहिती आहे. मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी नगर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या आपण सत्तेत आहोत, तसेच जिल्ह्यातील संघटना पूर्णपणे ताकदीने उतरली, तर विजय खेचून आणू, असा विश्वास महाजन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

‘जलसंपदा’च्या नूतन इमारतीचा प्रस्ताव
जलसंपदा विभागाच्या नगर येथील कार्यालयाची इमारत फार जुनी जीर्ण झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या धर्तीवरच जलसंपदा विभागाची नवी अद्ययावत इमारत उभारण्यात येईल. तसा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, अशी सूचना महाजन यांनी यावेळी बोलताना संबंधितांना केली.

बातम्या आणखी आहेत...