आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Of Balasaheb Nahata,,latest News In Divya Marathi

"रासप'चे प्रदेशाध्यक्ष नाहाटा प्रचारातून गायब, नाहाटा अज्ञातवासात गेल्याने कार्यकर्ते झाले सैरभैर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- सुमारे पंधरा वर्षांपासून तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाले आहेत. नाहाटा यांचा ठावठिकाणा नसल्याने त्यांचे कट्टर कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आमदार बबनराव पाचपुतेंचे कट्टर समर्थक म्हणून बाळासाहेब नाहाटा राजकारणात सक्रिय झाले. सुमारे पंधरा वर्षांपासून तालुक्यात कोणतीही निवडणूक असो नाहाटा हेच प्रचाराच्या केंद्रस्थानी असत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, साखर कारखाना, श्रीगोंदे नगरपालिका, खरेदी-विक्री संघ, तालुका देखरेख संघ, जिल्हा बँक, मोठ्या गावच्या ग्रामपंचायती आदींच्या निवडणुकांत नाहाटांचा धसका भल्याभल्यांनी घेतलेला होता. नाहाटा स्वत: निवडणूक लढवत नसले, तरी कोणाला विजयी करायचे व कोणाला अस्मान दाखवायचे याचे त्यांना अगाध ज्ञान होते. आमदार बबनराव पाचपुतेंपासून माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप, अण्णासाहेब शेलार या नेत्यांच्या निवडणुकांचे सारथ्य त्यांनी यापूर्वी केले होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाहाटा हे रासपचे उमेदवार असतील, अशी घोषणा खुद्द रासपचे संस्थापक महादेव जानकर यांनी केली होती. नाहाटांनी उमेदवारी दाखल केली अन् शेवटच्या क्षणी ती मागेही घेतली. निवडणूक प्रचार सुरू झाल्यापासून नाहाटा हे अज्ञातवासात आहेत. त्यांचे सर्व दूरध्वनी बंद आहेत. ते कोठे आहेत,याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांना देखील माहिती नाही. बाळासाहेब नाहाटांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यांच्या
अनुपस्थित हे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. कार्यकर्त्यांची यामुळे अडचण झाली आहे. आपला नेताच निवडणूक प्रचारातून गायब असल्याने कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत.विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन बहरात असताना नाहाटांचे गायब होणे चर्चेचा विषय झाले आहे. रासप हा भाजपचा मित्रपक्ष असून भाजपच्या कोट्यातून तो पाच जागा लढवत आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या युती धर्माला जागून नाहाटा हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या व्यासपीठावर येतात की नाही, याबद्दल देखील जनतेला उत्सुकता आहे.

नाहाटा लवकरच आपली भूमिका जाहीर करतील
बाळासाहेब नाहाटा हे लवकरच प्रकट होऊन त्यांची भूमिका जाहीर करतील. आमदार पाचपुते यांनी त्यांचा निष्ठूरपणे छळ केला आहे. त्यामुळे पाचपुतेंच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रश्नच येत नाही. नाहाटा हे रासपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांची राजकीय भूमिका ते स्वत: लवकरच जाहीर करतील. भरतकुमार नाहाटा, नगरसेवक.