आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईंच्या कमलचरणांचे दर्शन आणि प्रार्थना करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य होते, अशा शब्दांत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपली भावना व्यक्त केली.


या वेळी राष्ट्रपतींसमवेत राज्यपाल के. शंकरनारायणन, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांची उपस्थिती होती. साई संस्थानच्या अभिप्राय पुस्तिकेत आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, सार्इंच्या कमलचरणांचे दर्शन व प्रार्थना करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य होते. दर्शनानंतर त्यांनी अशी नोंद त्यांनी स्वहस्ताक्षरात केली. दर्शनानंतर राष्ट्रपती व इतर मान्यवरांनी शासकीय विश्रामगृहावर भोजन केले. त्यानंतर या ठिकाणी एक तास विश्रांती घेऊन राष्ट्रपतींनी दुपारी 4 वाजता नाशिककडे प्रयाण केले. या वेळी मुखर्जी यांना पाहण्यासाठी शिर्डी आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.


खराब हवामानामुळे उशीर
राष्ट्रपतींनी साईदर्शनानंतर सरकारी विश्रामगृहावर भोजन व विश्रांती घेतल्यानंतर नियोजित वेळेनुसार 4.22 वाजता ते हेलिपॅडकडे रवाना झाले. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर नाशिक येथे वादळी वारे व खराब हवामान असल्याचा संदेश येताच हेलिकॉप्टरचे उड्डाण थांबवण्यात आले.


बाळासाहेब विखे यांनी घेतली भेट
माजी खासदार बाळासाहेब विखे यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली. या वेळी महाराष्‍ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर उपस्थित होते.


राष्ट्रपतींचा नम्रपणा
साईदर्शन झाल्यानंतर राष्ट्रपती साईमंदिराच्या बाहेर पडले. पत्रकार कक्षातून ‘प्रेस’ असा आवाज येताच त्यांनी त्याबाबत कृषिमंत्री विखेंना विचारले. पत्रकारांनी आपणास नमस्कार केला, असे विखेंनी सांगताच राष्ट्रपतींनी माघारी फिरून हात वर करून पत्रकारांचा नमस्कार स्वीकारला.