आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपीआरएसमुळे बसेल गुन्हेगारीला आळा : शिंदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोलिसांच्या वाहनांना बसवण्यात आलेल्या जीपीआरएस यंत्रणेमुळे गुन्हेगारीला निश्चित आळा बसेल, असा विश्वास जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
जिल्हा पोलिस दलाच्या वाहनांवर बसवण्यात आलेल्या जीपीआरएस यंत्रणेचे उदघाटन, ब्रेथ अॅनालायझरचे वाटप शहीद पोलिस कर्मचारी दीपक कोलते यांच्या कुटुंबीयांना ३० लाखांची मदत पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आमदार शिवाजी कर्डिले मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, पोलिस दलातील आठ वाहनांना जीपीआरएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. एकूण १३३ वाहनांना जीपीआरएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती वेळेवर मिळून ते वेळेवर घटनास्थळी पोहोचतील. होणारा अनर्थ त्यामुळे टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, पोलिस कर्मचारी दीपक कोलते हे कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोलते यांना शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने त्यांना ३० लाखांची मदत दिली आहे. राज्यातील ही वेगळी घटना होती. राज्यात प्रथमच एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याला विशेष बाब म्हणून शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. शहीद कोलते यांच्या पत्नीला शासकीय नोकरीत घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल. पोलिस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी असतात. त्यामुळे कोलते यांच्या कुटुंबीयांना जी मदत लागेल, ती देण्यात येईल. त्याचबरोबर कोलते यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

संभाजी दहातोंडे म्हणाले, कोलते कुटुंबीयांना मदत मिळावी, म्हणून अनेकदा आंदोलन करण्यात आली. त्यानंतर काही मदत मिळाली. कोलते कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजित लकडे, भिंगार पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, तोफखाना पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ब्रेथ अॅनालायझर देण्यात अाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे, श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

आतामोबाइलकडे लक्ष द्यायला हवे...
कार्यक्रमसुरू असताना आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी ब्रेथ अॅनालायझर पोलिसांना दिले आहेत. वाहन चालवताना जे मोबाइलवर बोलतात, त्यांच्यावर कारवाईसाठीही एखादी यंत्रणा हवी. त्यावर राम शिंदे म्हणाले, कर्डिले साहेब, निश्चितपणे अशी काही यंत्रणा असल्यास ती बसवली जाईल.

अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी
शहीद पोलिस कर्मचारी दीपक काेलते यांना मदत मिळावी, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पत्नीला खास बाब म्हणून जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांना आपल्या भाषणात केली.

अठरा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही
गेल्या अठरा महिन्यांपासून कोलते यांच्या पत्नीला वेतन मिळालेले नाही. पोलिसांनी वर्गणी गोळा करुन दिलेली मदत तेवढी मिळाली. शहिदाचा दर्जा मिळाल्यानंतर सदनिका, पेट्रोलपंप दिला जातो. पण याबाबतही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शहिद दीपक कोलते यांचे मेहुणे कृष्णा बारगुजे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...