आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेथी 25 रूपये, कोथिंबीर 40 तर पालक गायब; नगरच्या बाजारात भाजीपाला भडकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झाल्याने भाजीपाला सडला. त्यानंतर विजेच्या लपंडावामुळे वेळेवर पाणी देता आल्याने भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम झाल्याने आवक घटून भाज्यांचे दर कडाडले आहेत. गेल्या उन्हाळ्यातही कोथिंबिरीच्या जुडीचा दर २० रुपयांच्या आता होता. सध्या मात्र तो ४० रुपयांवर गेला आहे. सर्व पालेभाज्यांच्या जुडीचा दर २० रुपयांच्या दरम्यान आहे. फळभाज्यांचा दरही किलोमागे ३० रुपयांहून अधिक आहे. 
 
नगर शहरात अनेक ठिकाणी भाजीबाजार भरतो. तो ज्या भागात भरतो, त्यानुसार भाजीपाल्याचे दर ठरतात. सध्या सर्वांत कमी दर केडगावच्या भाजीबाजारात आहेत. कारण केडगावात परिसरातील खेड्यांतून दररोज सायंकाळी ताजा भाजीपाला विक्रीस येतो. शेतकरी थेट आपला माल आणत असल्याने येथे दर तुलनेत कमी असतात. तेथेही कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर २५ रुपयांच्या दरम्यान गेला आहे. 
 
वांगी, घोसाळे, कारली, लाल भोपळा, फ्लॉवर, कोबी, दोडकी, टोमॅटो यांचे दर ४० रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान पोहोचले आहेत. घेवड्याच्या शेंगा तर ६० रुपये किलोने विकल्या जात आहेत. नवरात्रीनिमित्त मध्यंतरी मोठ्या प्रमाणात राजगिऱ्याची भाजी बाजारात आली होती. ही भाजी उपवासालाही खाल्ली जाते. या वर्षी राजगिऱ्याच्या भाजीच्या जुडीचा दरही १५ ते २० रुपयांच्या दरम्यान राहिले. 
 
सध्या सर्वांत महाग मेथीची भाजी आहे. मेथीच्या जुडीचा दर २५ रुपये आहे. वर्षभर मुबलक असलेला पालक मध्यंतरीच्या अतिपावसामुळे बाजारातून गायबच झाला आहे. जो तुरळक स्वरूपात बाजारात येतो, त्याची पाने किडलेली असतात, असे एका विक्रेत्याने सांगितले. हिरव्या मिरचीचा दरही ४० रुपये किलो आहे. वालाच्या शेंगा ४०, शेवगा ४० ते ६०, तोंडली ६० रुपये, आर्वी ६० ते ८० रुपये, असे इतर भाज्यांचे किलोमागील दर आहेत. हे दर बाजारांतील आहेत. कायम स्वरूपी भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडील भाजीपाल्याचे दर तर याहून अधिक आहेत. या सर्व परिस्थितीमुळे मध्यमवर्गीयांचे भाजीपाल्याचे बजेट कोलमडून गेल्यासारखी स्थिती आहे. त्यातल्या त्यात कांद्याचे दर आटोक्यात म्हणजे किलोमागे २० रुपयांच्या आत अाहेत. सध्याचा जुना कांदा संपल्यावर नवीन कांदा बाजारात येईपर्यंत त्याचे दरही वाढण्याची भीती आहे. 
 
मध्यंतरी म्हणजे १५ दिवसांपूर्वी झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतातला भाजीपाला अक्षरश: सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना तो काढून फेकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे हळूहळू आवक घडून दर कडाडले आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच भाजीपाल्याचे दर इतर वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे. 
 
दर उतरण्यासाठी महिना लागणार 
सध्या विजेच्या लपंडावामुळे सध्या विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांची वाढ होऊन त्या मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी एक महिन्याचा काळ जाणार आहे. त्यानंतर भाजीपाल्याचे दर उतरतील, असे एका शेतकऱ्याने सांगितले. 
 
मटारचा दर ८० रुपये 
दरवर्षी ऑक्टोबरमहिन्यात हिरव्या वाटाण्याची (मटार) भरपूर आवक होत असते. या वर्षी आवक अत्यंत कमी असल्याने दर किलोमागे ६० ते ८० रुपये प्रतिकिलो आहेत. त्यांच्या दरांमुळे त्यांना अत्यंत कमी मागणी आहे. सध्या तरी हिरव्या वाटाण्याला फक्त हॉटेलांतूनच मागणी आहे. 
 
विजेने केला खोळंबा 
पावसाने भाजीपाला वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे या भाजीपाल्याला पाणी देणे शक्य होत नाही. उन्हामुळे पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. वेळेवर पाणी देता आल्याने शेतकऱ्यांचा आधीचा पेराही वाया गेला आहे. 
 
फक्त बटाटे स्वस्त 
सध्यासर्वच भाजी बाजारांत बहुतेक सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत. यातून फक्त बटाटे सुटले आहेत. बटाट्यांचा दर मात्र दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहे. भारतीय स्वयंपाकात तसा बटाट्याचा वापर सढळ हाताने होतो. त्यामुळे तेवढाच सामान्यांना दिलासा आहे. 
बातम्या आणखी आहेत...