आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Primary Health Center,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्राथमिक आरोग्य केंद्रांतील 14 शस्त्रक्रियागृहे बंद !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा दिली जाते. तथापि, जिल्ह्यातील 14 केंद्रांतील शस्त्रक्रियागृह वर्षभरापासून बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शस्त्रक्रिया गृहे बंद आहेत. मात्र, याप्रकरणी अधिका-यावर कारवाईचे धाडस प्रशासनाने दाखवलेले नाही. जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंदे्र आहेत. त्यापैकी 90 केंद्रांत शस्त्रक्रिया गृह आहेत. दरवर्षी आरोग्य विभागाला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी उद्दिष्ट दिले जाते. परंतु शस्त्रक्रियागृहे बंद असल्याने उद्दिष्टपूर्तीत अडचणी येत आहेत. जेथे शस्त्रक्रिया होत नाहीत, तेथील नागरिकांना जवळच्या दुस-या आरोग्य केंद्रात पाठवले जाते.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया टाक्याची व बिनटाक्यांची अशा दोन प्रकारे केली जाते. टाक्यांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला सात दिवस आराम करावा लागतो. त्या तुलनेत बिनटाक्याची दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया कमी जोखमीची असते. रुग्णाला एक-दोन दिवसांचा आराम पुरेसा असतो. त्यामुळे बहुतेकांचा कल बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेकडे असतो. मात्र, जिल्ह्यात एकही लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ नाही. त्यामुळे बहुतेक रुग्ण खासगी रूग्णालयात जास्त पैसे मोजून या शस्त्रक्रिया करतात. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णांना नाइलाजास्तव टाक्यांची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. जिल्ह्यातील 90 प्राथमिक आरोग्य केंद्रांत शस्त्रक्रियागृहे बांधलेली आहेत, परंतु संबंधित वैद्यकीय अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे, तसेच इमारत जुनी झाल्याच्या कारणामुळे ही शस्त्रक्रियागृहे वापरात नाही. त्यातच वैद्यकीय अधिका-यांची 30 पदे रिक्त असल्याने सेवा देण्यातही अडचणी येतात. कार्यरत अधिका-यांवर रिक्त पदांचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे 2013-2014 या वर्षात 94 टक्केच उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले.
थेट सवाल डॉ. संदीप सांगळे अतिरिक्त आरोग्य अधिकारी

प्रश्न : 14 शस्त्रक्रियागृहे बंद पडण्याचे कारण ?

सांगळे : दुरुस्तीच्या कामामुळे, तसेच निर्जंतुकीकरण झाले नसल्याने ते बंद आहेत.

प्रश्न : काय कारवाई केली ?

सांगळे : संबंधित वैद्यकीय अधिका-यांना नोटिसा काढल्या आहेत.

प्रश्न : बंद शस्त्रक्रियागृहे केव्हा सुरू करणार ?

सांगळे : वैद्यकीय अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. निर्जंतुकीकरण केल्यानंतर शस्त्रक्रियागृहे तातडीने सुरू केली जातील.
ही शस्त्रक्रियागृहे बंद
शेडी(अकोले), देवगाव, रुइछत्तीशी (नगर), शिरसगाव, नेवासे खुर्द (नेवासे), बोटा, जवळे बाभळेश्वर (संगमनेर), शेवगाव, माणिक दौंडी, पिंपळगाव टप्पा (पाथर्डी) यासह चौदा ठिकाणची शस्त्रक्रियागृहे बंद आहेत.
अध्यक्षांच्या गावातही...
जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या नेवासे तालुक्यातील शिरसगावात शस्त्रक्रियागृह आहे. तेथे वैद्यकीय अधिका-याचे एक पद रिक्त असून शस्त्रक्रियागृहही बंद आहे.