आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन-धन योजनेंतर्गत साडेअकरा कोटी रुपये जमा, योजनेकडे नागरिकांचा कल वाढतोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरिकांनी बँकांमध्ये खाते उघडून आतापर्यंत सुमारे ११ कोटी ५६ लाख रुपये जमा केले आहेत. अल्पावधीतच योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिकांचा या योजनेकडे कल वाढत आहे.
देशात जन-धन योजना लागू झाल्यानंतर जनतेपर्यंत या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे गरिबातील गरीब माणसानेही या योजनेचा लाभ घेऊन बँकेत खाते उघडले. योजनेनुसार शून्य बॅलन्सवर बँक खाते उघडण्यात येत अाहे. यात एटीएम सुविधा, १ लाख रुपयांचा दुर्घटना विमा योजना, देशांतर्गत सर्व शाखांमध्ये पैसा भरणा-काढण्याची सुविधा, शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ, आपदग्रस्तांना थेट रक्कम देण्याची सुविधा या योजनेंतर्गत करता येणार आहे. व्यवहार सुरू झाल्यानंतर बँक व्यवस्थापक परतफेडीचा पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट देणार आहे. रुपे एटीएम कार्डचा वापर केल्यानंतर अपघाती विम्याचे संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाकांक्षी असून संपूर्ण भारतच बँकांशी जोडला जाणार आहे. यासाठी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू असून बँकांनी गावोगाव केंद्र सुरू करून खाते उघडण्यास प्रारंभ केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०१४ पासून योजनेचे काम सुरू झाले. योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यात सध्या ३ लाख ४९ हजार ७०९ नागरिकांनी खाते उघडल्याची नोंद अग्रणी प्रबंधकांकडे आहे. शून्य बँलन्सवर खाते उघडल्यानंतर या खात्यावर अनेकांनी पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या खात्यावर विविध बँकांच्या ६४७ शाखांमध्ये ११ कोटी ५६ लाख रुपये खातेदारांनी जमा केले आहेत.

जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी बँकनिहाय गावे व शहरातील प्रभाग नेमून दिले आहेत. जिल्ह्यात ३१ बँकांत नागरिकांनी या योजनेंतर्गत खाती उघडली असून आतापर्यंत २ लाख ५५ हजार ८६ खातेदारांना रुपे कार्ड (एटीएम) वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित खातेदार रुपे कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर ज्या ग्राहकांना पासबुक मिळाले नाही, त्यांच्याकडूनही पासबुकची मागणी होत आहे.

सर्वाधिक खातेदार स्टेट बँकेत
जिल्ह्यात प्रधानमंत्री जन-धन या योजनेंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत सर्वाधिक १ लाख ६ हजार ६०५ खाती उघडण्यात आली आहेत. या खातेदारांपैकी ७ हजार ३२५ खातेदारांना रुपे कार्ड वितरित करण्यात आली आहेत. या जन-धन योजनेच्या खात्यावर खातेदार ग्राहकांनी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख ६७ हजार रुपये जमा केले आहेत.

योजनेचा लाभ घ्यावा
बँकनिहाय गावे नेमून खाते उघडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच योजनेचे निकष देखील संबंधित बँकांना पाठवण्यात आले आहेत. बँकांनी खाते उघडल्यानंतर तातडीने पासबुक देण्याचे बंधनकारक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी जन-धन योजनेचा लाभ घ्यावा.''
व्ही. टी. हुडे, अग्रणी प्रबंधक.

सर्वांना पासबुक देण्याच्या सूचना
योजनेंतर्गत सर्व खातेदारांना पासबुक दिले जाणार आहेत. तशा सूचना संबंधित शाखांना दिल्या आहेत. योजनेतील विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खात्यात व्यवहार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्यांनी व्यवहार केला नसेल त्यांनी व्यवहार करावा. कारभारी चिंग्टे, जिल्हा समन्वयक, स्टेट बँक ऑफ इंिडया.