आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाखो विद्यार्थ्यांनी ऐकले मोदी विचार, नगर शहरातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये थेट प्रक्षेपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शिक्षक दिनानिमित्त प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या भाषणाचे प्रक्षेपण टीव्ही, रेडिओसह इतर माध्यमांतून करण्यात आले. नगर शहरातील सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील लाखो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींचे विचार ऐकले.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण टीव्ही, इंटरनेट, तसेच रेडिओवरून करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने जिल्हा परिषद, महापालिका, तसेच विभागीय आयुक्तांना या भाषणाचे प्रक्षेपण करण्याचे निर्देश दिले. शाळांमध्ये टीव्ही संच नसेल, तर मुख्याध्यापकांनी अथवा शाळा व्यवस्थापन समितीने टीव्ही संच उपलब्ध करून द्यावा, वीजपुरवठा नसल्यास त्याठिकाणी जनरेटरची व्यवस्था करावी, असे आदेशही शिक्षण विभागाने संबंधित यंणेला दिले होते. जिल्ह्यातील सुमारे ३१६ शाळांमध्ये विजेचे कनेक्शन नाही. या शाळांमध्ये ऐनवेळी जनरेटर उपलब्ध होणे अडचणीचे असल्याने मोदींच्या भाषणाचे नियोजन करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर होते.
मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवणे बंधनकारक नसल्याचा मेसेज व्हॉटस् अ‍ॅपसह इतर सोशल साईट्सवर फिरत होता. पण तसे लेखी आदेश नसल्याने नगर शहरातील सर्व शाळांनी टीव्ही संच लावून विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे विचार ऐकवले.
नगर शहरात महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्र १९५ खासगी व महापालिकेच्या शाळा आहेत. त्यात ६ उच्च माध्यमिक विद्यालये, ११६ प्राथमिक व ७३ माध्यमिक विद्यालये आहेत. उच्च माध्यमिकमधील भाषणाच्या प्रसारणाचा अहवाल उशिरापर्यंत शिक्षण मंडळाला सादर झाला नव्हता. पण प्राथमिक व माध्यमिकच्या शंभर टक्के शाळांमध्ये भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. शहरातील ६८ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. शनिवारी दुपारपर्यंत याचा संपूर्ण अहवाल शिक्षण मंडळाला सादर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे नियोजन मा कोलमडले होते.
पंतप्रधानांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी एकाचवेळी संवाद साधला. त्यांनी विविध उदाहरणांसह अत्यंत चांगली माहिती दिली. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे नेले, यासंदर्भात सांगितल्यानंतर आणखी ऊर्जा मिळाली. प्रथमच शिक्षक दिनी विद्यार्थी आणि शिक्षकांना उत्तम प्रबोधनात्मक भाषण ऐकायला मिळाले.'' डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.
आम्हाला पंतप्रधानांचे भाषण खूप आवडले. त्यांनी भाषणात छोट्या, छोट्या गोष्टी सांगितल्या. त्याचा विशेष आनंद झाला. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी लक्षात ठेवू. विशेष म्हणजे चांदण्या रात्री सुईत दोरा ओवण्याचा खेळ त्यांनी सांगितला. या खेळामुळे वीजबचत होईल, असाही संदेश दिला. या भाषणातील माहितीचे आम्ही नक्की अनुकरण करू.'' आरती बाचकर, विद्यार्थिनी, पिंपरी अवघड.