नगर- अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या सभेला जिल्हाभरातून दोन लाखांहून अधिक लोक आले. मात्र, मोदींच्या भाषणाने उपस्थितांचे समाधान झाले नाही. काही तरी सणसणीत ऐकण्यास आतूर असलेल्या, विशेषत: राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील व वेगळा राजकीय पिंड असणाऱ्या नगरकर जनतेसमोर मोदींनी मोठ्या उत्साहात सुरू केलेल्या भाषणात फारसे नवीन नव्हते, तरीही उपस्थितांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मात्र, शिवसेनेबद्दल चकार शब्दही काढला नाही. त्यांचे भाषण जेमतेम 18 मिनिटांचे होते. त्यामुळे अनेकांची निराशा झाली.
मोदी यांच्या सभेची वेळ साडेअकराची जाहीर करण्यात आली होती. प्रत्यक्षात ते दोनला दहा मिनिटे कमी असताना सभास्थानी आले. त्यावेळी रखरखीत उन्हात लोक त्यांची प्रतीक्षा करत होते. नेहमी जाकिटात येणाऱ्या मोदी यांनी राहुरीच्या सभेत मात्र ते घातले नव्हते. पांढराशुभ्र कुर्ता व पायजमा असा त्यांचा वेष होता. आल्या आल्या त्यांनी दोन वाक्ये मराठीत बोलून उपस्थितांची मने जिंकली. मोदींनी अलीकडील काळात राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. राहुरीच्या सभेत त्यांनी त्याचीच री ओढली. त्यात नवीन भाग म्हणजे दोन्ही काँग्रेसची वृत्ती, प्रवृत्ती व चारित्र्य एकच असल्याचे त्यांनी नमूद केले. आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या 69 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचा खुंटलेला विकास, देशात पहिल्या क्रमांकावर जाण्याची क्षमता असतानाही विकासात राज्य कसे मागे आहे, हे त्यांनी मांडले. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये येऊन पावन झालेल्यांची गोची झाली. उपस्थितांत श्रीगोंदे, पाथर्डी व कोपरगाव येथील कार्यकर्ते मोठ्या माणावर होते. तिरंगी व घड्याळ्याचे चिन्ह असलेला पंचा काढून भाजपचा केशरी-हिरवा पंचा अनेकांनी गळ्यांत बांधला असला, तरी त्याच्या नेत्यांनी भाजपशी केलेली सोयरिक पचवणे जड जात असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून जाणवत होते.
मोदी यांनी
आपल्या भाषणात कोठेही शिवसेनेचे नाव घेतले नाही. ह्यभाजपके विरोधीह्ण म्हणून उल्लेख करतानाही त्यांनी फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचेच नाव घेतले. यावरून त्यांनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारण्याचे ठरवले असावे, असे दिसते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्यांनी ते लँड माफिया असल्याचा गंभीर व नवीन आरोप केला. दोन्ही काँग्रेसचे नेते लोकांच्या जागा व घरे बळकावणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. समोरच्या लोकांच्या डोळ्यांना डोळे भिडवून विचार मांडणे, भावनिक आवाहन, मोठा पॉझ घेत जनतेच्या मनाची पकड घेणाऱ्या शब्दांची अचूक निवड हे मोदींच्या भाषणाचे वैशिष्ट्य येथेही जाणवले. लोकांना ते भावलेही. पण, एखादी मैफल रंगात यावी अन् अचानक संपावी, तसे मोदींचे भाषण अचानक संपल्याने उपस्थितांची निराशा झाली.
जिल्ह्यातील कोणत्या उमेदवारांना होणार सभेचा लाभ?
पंतप्रधान मोदी यांच्या सभेने भाजप उमेदवारांच्या प्रचाराला धार आली, हे निश्चित. विशेषत: ज्या राहुरी मतदारसंघात ते आले, तेथील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या मतांत या सभेने किती भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण राहुरीत शिवसेनेच्या डॉ. उषा तनपुरे अचानक प्रचारात आघाडीवर आल्या आहेत. अशावेळी मोदींची सभा कर्डिलेंना लाभदायक ठरणार आहे. याशिवाय नेवासे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, अकोले मतदारसंघातील अशोक भांगरे, शेवगाव-पाथर्डीतील मोनिका राजळे, नगर मतदारसंघातील अभय आगरकर, कोपरगाव मतदारसंघातील स्नेहलता कोल्हे यांना या सभेचा निश्चित लाभ होण्याची चिन्हे आहेत.