आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रिसिजन’चा आता चीनमध्ये दुसरा टप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- चीनमध्ये सुरू केलेली पहिली अत्याधुनिक फॅक्टरी यशस्वी झाल्यानंतर प्रिसिजन कंपनी आता जून 2013 पासून नव्या फॅक्टरीचे काम हाती घेत आहे. अवघ्या एका वर्षात फॅक्टरीचे काम पूर्ण होईल आणि जून 2014 पासून उत्पादन सुरू होईल. चीनमधील एका कंपनीबरोबरची ही संपूर्ण गुंतवणूक सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटींची असेल, असे प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यतीन शहा म्हणाले, की प्रिसिजन कंपनीने चीनमध्ये जायचे धाडस केल्यानंतर तेथील प्रशासनाने या गुंतवणुकीचे स्वागतच केले. गुंतवणूक वाढावी यासाठी चीनमधील हुझाऊ या शहरात 28 मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन तेथील स्थानिक प्रशासनाने केले होते. त्यात चीनमधीलच ‘निंग्बो शेंगलाँग ऑटोमोटीव्ह कंपोनेन्ट लिमिटेड’ या कंपनीबरोबर प्रिसिजनने भागीदारी करार केला. शेंगलाँग कंपनीचे चेअरमन लुओ यलाँग, डीन लुओ, हॅन्सन झँग तर प्रिसिजनतर्फे श्री. शहा व संचालिका डॉ. सुहासिनी शहा उपस्थित होते. त्यात नवीन फाउंड्री सुरू करण्याचा निर्णय झाला. चीनमधील हुझाऊ गावाच्या परिसरात ‘हुझाऊ पीसीएल शेंगलाँग स्पेशलाईड कास्टिंग कंपनी’ स्थापन करून 16 एकर जागा घेतली आहे. तेथे जून 2013 पासून फाउंड्रीचे बांधकाम सुरू होईल व जून 2014 मध्ये उत्पादन सुरू होईल. या कंपनीतून दरवर्षी 4 लाख कॅमशाफ्टचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. येत्या 2016-17 पासून ती 8 लाखावर नेली जाणार आहे. या फाउंड्रीचे व्यवस्थापन पूर्णत: ‘प्रिसिजन’चे असेल. त्यासाठी सोलापुरातून काही अधिकारी वर्ग चीनमध्ये जातील.

प्रिसिजनने पहिल्या टप्प्यात निंग्बो येथे एक प्रकल्प सुरू केला आहेच. तेथे 50 हजार कॅमशाफ्टचे उत्पादन होते. सध्या सुरू असलेल्या कंपनीचे नाव शेंगलाँग पीसीएल कॅमशाफ्ट लिमिटेड असे आहे. सध्या फोर्ड या कार तयार करणार्‍या कंपनीला कॅमशाफ्ट पुरवले जात आहे. चीनमध्ये दुसरा टप्पा झाल्यानंतर आता र्जमनी व ब्राझील या देशांत उत्पादन सुरू करण्याचा मानस आहे, असेही श्री. शहा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. सुहासिनी शहा, संचालक आर. आर. जोशी, माधव वळसे, राजकुमार काशीद व जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे उपस्थित होते.


तत्परतेने मूलभूत सुविधा
चीनमध्ये नव्या उद्योगासाठी जागा, पाणी, वीज, रस्ता अशा मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील एक विशेष अधिकारी आमच्या कंपनीसाठी नियुक्त केला आहे. या सुविधा तत्परतेने पुरविल्या जात आहेत. त्यासाठी तेथील स्थानिक प्रशासन निर्णय घेते. तेथे महापौरांना सर्व प्रशासकीय अधिकार आहेत. कोणतीही कामे अडत नाहीत. तेथील प्रशासनात गतीने कामे होतात, असा आपल्याला अनुभव आला आहे.’’ यतीन शहा व्यवस्थापकीय संचालक , प्रिसिजन