आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विसापूर कारागृहातील बंदिजन गिरवत आहेत श्रमसाधनेचे धडे, कैद्यांनी पिकवला भाजीपाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कुठेबैलांची औतकाठी, नांगरटीची मशागत, पेरणीच्या चाड्यातून काळीची ओटी भरण्यासाठी तनतोडा करण्यासाठी आणि गहू, ज्वारी, उसाच्या फडांना नि भेंडी, दुधी भोपळा, मेथी, कोबीच्या वाफ्यांचं भरणं करण्यासाठी राबणारे हात! चढत्या उन्हात काळीच्या ओटीपोटीवर चाललेली श्रमसाधना आणि निथळत्या घामावर खपणाऱ्या हातावर प्रसन्न होऊन डवरलेल्या पिकांतून डोलणारा विठू!

हे चित्र आहे १३० एकरांत फैलावलेल्या विसापूर खुल्या कारागृहाचे। कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्या प्रोत्साहनातून ९४ बंदिजन विसापूर कारागृहात श्रमसाधना करताना पाहिले की, वाट चुकलेली पावले उजेडाच्या दिशेने माघारी फिरल्याचे जाणवते.
विसापूर पिंपळगाव पिसा या गावांच्या सजात कारागृहाचे १३० एकर क्षेत्र आहे. कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकारी, सुरक्षा रक्षक अशी एकूण ८८ पदे मंजूर आहेत. सध्या ४४ कर्मचारी आहेत. कारागृहाची बंदी क्षमता २०० असून सध्या या ९४ कैदी आहेत.

कारागृह अधीक्षक काळे यांच्या प्रयत्नास कैद्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे कारागृहातील शेती आदर्शवत झाली आहे. काळे यांनी उपलब्ध संसाधनातून नवनिर्माणाची प्रेरणा कारागृह कर्मचारी आणि बंदिजनात जागवली. विसापूर आणि पिंपळगाव पिसा परिसरातील पडिक पडलेली शेती लागवडयोग्य करण्यासाठी कैद्यांनी नांगर, औत, तिफण, डौरं, फावडी ही औजारे, तर बनवलीच, पण त्याचबरोबर गायी-बैलांसाठी गोठे आणि प्रत्येक गटात दुपारच्या विश्रांतीसाठी सुरक्षा चौकीसाठी कौलारू शेडची निर्मिती केली.

मागील सहा महिन्यांत कैद्यांनी टोमॅटो, दोडके, घोसाळे, घेवडा, भेंडी, मेथी, कोथिंबीर, दुधी भोपळा, वांगी, फूलकोबी या भाज्यांचे विक्रमी उत्पादन काढले आहे. कारागृहाच्या शेतीत हुरड्यात आलेल्या ज्वारीचे, पोटऱ्यात आलेल्या गव्हाचे नि उसाचे तरलेले डौलदार फड उभे आहेत. न्याहरी करून कामावर गेलेल्या बंदिजनाना दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणीच बैलगाडीतून दुपारचे भोजन पोहोचवले जाते. टाकाऊ वस्तूपासून कैद्यांनीच ही बैलगाडी तयार केली आहे. केवळ हजार खर्चात. तिची बाजारातील किंमत ७५ हजार. सहा महिन्यांत १५ लाख ४० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

'सुधारणा आणि पुनर्वसन' हे ब्रीदवाक्य असणारा कारागृह विभाग बंदिजनांना सुधारण्याची संधी देत असतो. मोठी सजा झालेले कैदी वागणुकीचा निष्कर्ष काढून सजेच्या शेवटच्या टप्प्यात खुल्या कारागृहात दाखल होतात. विसापूर हे राज्यातील एकमेव खुले कारागृह आहे. इंग्रज आमदानीत १८९० च्या सुमारास भयानक दुष्काळ पडला होता. लोकांच्या हाताला काम देण्यासाठी विसापूर तलाव तयार करण्यात आला.

गुन्हेगार जमात असा शिक्का बसलेल्या हूर जमातीच्या लोकांना, जे मातीकामात कुशल मानले जात, आणि डेक्कन सिध्ददोष प्रकरणातील गैंगला धरणाच्या कामासाठी विसापूर येथे आणले गेले. या बंदींसाठी विसापूर जेलची पायाभरणी झाली. बेड्या ठोकण्यात आलेल्या या हातांच्या श्रमसाधनेतून १९२७ पर्यंत हजार फूट लांब आणि ८४ फूट उंचीची तलावाची भिंत उभी राहिली. १९४५ मध्ये हेक्टरवर विसापूर कारागृहाची इमारत उभी राहिली.
बातम्या आणखी आहेत...