आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाच्या गुन्ह्यातील कैदी बेडीसह पसार; बस स्थानकासमोरील घटना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी पाथर्डी येथून आणलेला कैदी माळीवाडा बसस्थानकासमोरून बेडीसह पळून गेला. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संबंधित कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानिफनाथ अण्णा दळवी (30, मिरी, ता. पाथर्डी) असे या कैद्याचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी परिसरात राहणार्‍या नातेवाईकाचा खून करून तो दोन वर्षे फरारी होता. जून 2012 मध्ये त्याला अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. कोठडीची मुदत संपल्याने त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक सुनील पुंडे व अन्य एक कर्मचारी बुधवारी सकाळी नगरला जाणार्‍या बसमध्ये घेऊन निघाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बस माळीवाडा बसस्थानकासमोर स्टेशन रस्त्याच्या डाव्या बाजूला प्रवासी उतरण्यासाठी थांबली. खाली उतरताना या कैद्याने पुंडे यांच्या हाताला हिसका मारून बाजार समितीच्या दिशेने पळ काढला. पुंडे यांनी आरडाओरड करून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दळवी पसार झाला. पुंडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्मचारी कल्याण गाडे तपास करत आहेत.