आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या बंदिबांधवांनी लिहिली महात्मा गांधीजींना पत्रं, भारतीय डाक विभागाचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारतीय डाक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय पत्रलेखन स्पर्धेस येथील कारागृहातील बंदिजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “प्रिय बापू” या संबोधनाने अनेक बंदिजनांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे शुक्रवारी कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांनी वरिष्ठ पोस्टमास्तर अंबादास टेकाळे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे, डाक विभागाचे विपणन अधिकारी नितीन चौधरी उपस्थित होते. 
 
राष्ट्रपिता बापूंच्या नावे पत्रलेखन करण्याची संधी डाकविभागाने या स्पर्धेद्वारे उपलब्ध केली आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. यासंदर्भात स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत सिनिअर जेलर शेडगे यांनी बंदिजनांना पत्रलेखन स्पर्धेची कल्पना सांगितली. अनेक बंदिजनांनी प्रिय बापूंच्या नावे पत्र लिहिण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर डाक विभागाकडून पत्रलेखन साहित्य लिफाफे कारगृह प्रशासनास देण्यात आले. महात्मा गांधी यांच्या संदर्भातील पुस्तकेही कारागृह अधिकाऱ्यांनी बंदिबांधवांना वाचण्यासाठी उपलब्ध केली. 
 
अनेक बंदिबांधवांनी अत्यंत सुवाच्च अक्षरात आदरणीय बापू, प्रिय बापू, महात्मा मोहनदास करमचंद गांधी तथा प्रिय बापूजी, आदरणीय बापूस साष्टांग दंडवत अशा मायन्याने लिहिलेली पत्रे शुक्रवारी डाक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. यासंदर्भात बोलताना सिनिअर जेलर शेडगे म्हणाले, बंदिबांधवांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी “सुधारणा पुनर्वसन” या कारागृह विभागाच्या ब्रीदवाक्यानुसार प्रशासन कार्यरत आहे. विकारातूनच राग, क्रोध निर्माण होतो आणि गुन्हे घडतात. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसेचा दाखवलेला मार्ग विकाराचे दमन करू शकतो. तो विचार आणि पश्चातापबुध्दिसाठी ही पत्रलेखन स्पर्धा एक संधी ठरली. अधीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आवाहनास बंदिजनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 
 
अधीक्षक सावंत आणि शेडगे यांच्या प्रयत्नामुळे बंदिजनांना “प्रिय बापूं” शी पत्ररूपी हितगूज करता आले. ही पत्रे वरिष्ठ कार्यालयास विशेष टपालाने पाठवली जातील. नगर कारागृह प्रशासनाचे हे काम पुरस्कारास पात्र असल्याची भावना वरिष्ठ पोस्टमास्तर अंबादास टेकाळे यांनी व्यक्त केली. 
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त डाक विभाग आयोजित पत्रलेखन स्पर्धेसाठी बंदिबांधवांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्यामकांत शेडगे यांनी वरिष्ठ पोस्टमास्तर अंबादास टेकाळे, विपणन अधिकारी नितीन चौधरी यांच्याकडे सुपूर्द केली. 
बातम्या आणखी आहेत...