आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी दूध संस्थांची दराबाबत मनमानी सुरूच; सरकारी दर 27 रुपये असताना देतात अवघे 22

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दूध खरेदीचा सरकारने जाहीर केलेला दर २७ रुपये असला, तरी खासगी दूध संस्थांनी खरेदी दरात पाच रुपयांची घट केल्याने तो २२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात दूध उत्पादकांवर संकट ओढवले. असहाय दूध उत्पादकांची ही लूट आहे. सरकारने या खासगी दूध संस्थांना सरकारी दराप्रमाणे दूध खरेदी करण्यास भाग पाडावे, असी मागणी दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे. तसे झाल्यास जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 
 
राज्यात दुधाचे दर सरकार जाहीर करते. पण, सरकारचे या व्यवसायावर अजिबात नियंत्रण नाही. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे राज्यात शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणाऱ्या या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. सरकारने दोन महिन्यांपूर्वी गायीच्या दुधासाठी खरेदी दर प्रतिलिटर २७ रुपये जाहीर केला होता. पण, उन्मत्त झालेल्या खासगी दूध संस्थांनी लगेच दोन रुपये दर घटवत सरकारी आदेशाला आपण अजिबात जुमानत नसल्याचे दाखवून दिले. त्यानंतर दूध पावडरच्या दराचे कारण दाखवत आणखी तीन रुपये दर घटवला. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. 
 
गायी म्हशींच्या दुधाचा खरेदी दर अनुक्रमे २२ ३६ रुपये आहे. दूधविक्रीचा दर मात्र अनुक्रमे ४४ ६० रुपये आहे. शेतकऱ्यांपेक्षा मधल्या लोकांना जास्त पैसे मिळत आहेत. सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मागे उभे आहे, असा दावा करते मात्र, दुधाच्या बाबतीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. एक प्रकारे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाच हा प्रकार आहे, अशी टीका डेरे यांनी निवेदनात केली आहे. 
 
सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या संपामुळे नमून राज्य सरकारने दूध दरात तीन रुपये दरवाढ केल्याचे मोठ्या आवेशात जाहीर केले. पण, खासगी दूध संघांनी सरकारला दणका देत आपले खरेदीचे दर एकूण पाच रुयांनी घटवले होते. यामागे दूध पावडरचे दर घटण्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे. काही खासगी दूध संस्था शेतकऱ्यांना प्रतिलिटर २० रुपयाचा दर देत आहेत. दूध संकलनात किमान ७० टक्के वाटा या संस्थांचा आहे. राज्य सरकार दररोज अवघ्या ३५ ते ४० हजार लिटर दुधाची खरेदी करते. त्यामुळे सरकारकडे दुधाचे दर ठरवण्याचा फारसा अधिकार उरत नाही, असे या धंद्यातील जाणकारांचे म्हणणे आहे. 
 
राज्याची दुधाची खरी गरज पावणे तीन कोटी लिटरची आहे. प्रत्यक्षात राज्याचे उत्पादन दररोज एक कोटी १० लाख लिटरचे आहे. त्यात शेजारील राज्यांतून सुमारे १५ लाख लिटर आपल्या राज्यात येते. सर्व एकूण सव्वा कोटी लिटर दूध आपल्याकडे दररोज संकलित होते. त्यातील अवघे ६० लाख लिटर दूध खाण्यासाठी विकले जाते. उर्वरित दुधापैकी दही, श्रीखंड, खवा आदी उपपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. बाकीच्या दुधाची पावडर निर्माण केली जाते. आपल्याकडील दुधाची पावडर १८० रुपये प्रतिकिलो पडते. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र पावडरचा दर १२० ते १३५ रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे देशातली पावडर देशातच राहते. पावडर निर्माण करून ती कोठे विकायची हा प्रश्न मोठा असल्याने सध्या दूध शिल्लक राहत आहे. परिणामी त्याचे दर कोसळत आहेत, अशी माहिती समजली. 
 
एकेकाळी दूध उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर घसरला आहे. केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. या उलट उत्तर प्रदेश, गुजरात कर्नाटक राज्यांत दूध धंदा अधिक वेगाने वाढत अाहे. महाराष्ट्राच्या बाजूच्या सर्व राज्यांत दुधाचा खरेदी दर ३० रुपयांच्या दरम्यान आहे. विशेषत: त्यात भाजपशासित राज्येही आहेत. आपल्याकडे मात्र स्थिती शोचनीय असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 
 
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दूध धंद्याने हात दिला. सध्याच्या सरकारने हा हातच काढून घेतल्याने विदर्भ मराठवाड्याची स्थिती नगर जिल्ह्यात आणली आहे. शेजारील कर्नाटक सरकार दूध उत्पादकांना लिटरमागे पाच रुपये अनुदान देते. गोव्यातील भाजपचेच सरकार दुधाच्या दराच्या ४० टक्के अनुदान देते. पुढारलेल्या म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र दुधाला अनुदान तर सोडाच, पण हा धंदाच मोडाण्याची सरकारची धोरणे असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. 
 

आपल्या राज्यात विशेषत: गायीच्या दुधामध्ये होणाऱ्या भेसळीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे ग्राहक दुधापासून दूर जात आहेत. पिण्यासाठी दुधाच्या मागणीत दिवसेंदिवस घट होत आहे. विविध पातळ्यांवर होणाऱ्या विविध रसायने इतर पदार्थांच्या भेसळीमुळे लोक कोऱ्या चहाकडे वळत आहेत. त्याचा परिणाम तळातील शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. दूध भेसळीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. एकूणच शेतकऱ्यांना पूर्ण संपवण्याचा राज्य सरकारचा डाव आहे.  
- गुलाबराव डेरे, अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, अहमदनगर. 
 
शेतकरी, ग्राहकांची लूट 
खासगीदूध संस्था ठरवतील तेच दर अशी स्थिती आहे. दर घटवण्याच्या त्यांच्या निर्णयाचा दूध उत्पादकांना हा मोठा झटका बसला. खासगी संघांचा दूध खरेदी दर २७ वरून २२ रुपयांवर आला आहे. ही घट मात्र ग्राहकांना लागू नाही. त्यामुळे ग्राहक दूध उत्पादक, अशी दोघांचीही सर्रास लूट सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...