आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसस्थानकांतून खासगी प्रवासी वाहतूक सेवेस सुरुवात, जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेसह एसटी वर्कर्स काँग्रेससह (इंटक) इतर संघटनांनी पुकारलेला बेमुदत संप तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पावले उचलून बसस्थानकांतून ३५ खासगी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु, खासगी वाहतूक सेवा एसटीची उणीव भरून काढू शकणार नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक अजूनही कोलमडलेलीच आहे. यामुळे प्रवशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 
 
जिल्ह्यात सुमारे सातशे एसटीच्या बसेस प्रवासी वाहतूक सेवा देतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा करार ३१ मार्च २०१६ रोजी संपला आहे. इतर मंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी वेतन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मिळते. इतर राज्यातील परिवहन महामंडळांनी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे सर्व बस अागारात जमा आहेत. ऐन दिवाळीत प्रवाशांची तारंबळ उडाली आहे. 

याचा फायदा खासगी बेकायदेशीर प्रवासी वाहतूकदारांनी घेऊन तीन ते पाचपट भाडे आकारणी केली. प्रवाशांनीही मिळेल त्या वाहनातून प्रवास करून ऐच्छिक ठिकाण गाठले. गुरुवारी संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पावले उचलली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्यवाही तालुका स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने खासगी शाळा, संस्थांच्या बसेस, नगर शहरातील बसची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांची गर्दी आणि मागणी पाहून बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यावर जिल्हाधिकारी अभय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम लक्ष ठेवून आहेत. 
 
जिल्ह्यात गुरुवारी ३५ खासगी बसची सेवा उपलब्ध करून दिली. या बसेस एसटी स्थानकातील प्रवाशांना एेच्छिक ठिकाणी प्रवासी देत आहेत. दिवाळीच्या हंगामात एसटीचे चाक थांबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पण खासगी सेवा उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. पण प्रवाशांची आवश्यक गरज पूर्ण झाली नाही. संपामुळे तातडीची गरज असलेल्या प्रवाशांनी स्वत:चे वाहन उपलब्ध केले. तसेच काहींनी प्रवास करणेच टाळले. शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. 

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन स्कूल बस आणि शहर बसवाहतूक यांच्या काही बस तहसीलदार सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आल्या. 
 
एसटीचे दीड कोटींचे उत्पन्न बुडाले 
दिवाळीच्या सुटीतील हा गर्दीचा हंगाम असल्याने राज्य परिवहन महामंडळाला या कालावधीमध्ये चांगले उत्पन्न मिळत असते. जिल्ह्यात दररोज सुमारे ५५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे. तिसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिल्याने महामंडळाचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. 
 
कर्मचारी संघटना संपावर ठाम 
पोलिसांनी संप केल्यानंतर गावगुंडांकडून संरक्षण घेतल्यासारखा हा प्रकार आहे. संप मोडून काढण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. मुक्कामी कर्मचाऱ्यांना तेेथून बाहेर काढले. आंदोलनावर ठाम असून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. 
- अरुण दळवी, सरचिटणीस, कामगार संघटना. 
 
प्रवाशांची उपलब्धता पाहून बस सोडणार 
दोन दिवसांपासूनच खासगी वाहतुकीला परवानगी दिली. त्याची कार्यवाही आजपासून सुरू आहे. प्रवासी उपलब्ध असतील त्या मार्गावर या बसेस सोडल्या जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत आपण ही योजना राबवत आहोत. 
- नितीन मैंड, विभाग नियंत्रक, एसटी. 
बातम्या आणखी आहेत...