आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा इमारत बांधकाम गैरव्यवहाराची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - औरंगाबाद महामार्गावर उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार शाकीर शेख यांनी लोकायुक्तांकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तथापि, चौकशी अहवाल वेळेत सादर केल्याने मनपा आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना बुधवारी (२९ जून) दुपारी साडेबारा वाजता सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.

तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांच्या काळात सहा कोटी खर्च करून प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता गैरप्रकार झाले, अशी तक्रार करत शेख यांनी लोकायुक्तांकडे चौकशीची मागणी केली होती. बांधकामाचा ठेका बेस्ट कन्स्ट्रक्शन आर. आर. कपूर यांना देण्यात आला होता. या ठेकेदारांनी गुणवत्तेशी तडजोड केली. या ठेकेदारांना तत्कालीन शहर अभियंता विष्णू पालवे यांनी आपल्या अधिकारात सिमेंटची दरवाढ मंजूर केली. २०१४ पर्यंत ठेकेदारांना तीन कोटी ८६ लाखांचे बिल देण्यात आले. बांधकाम सुरू असताना मनपाच्या विकासभार या लेखाशीर्षामधून मोठ्या प्रमाणात निधी वापरण्यात आला. काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यावर अवाजवी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले.
शेख यांच्या या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह चौकशी अहवाल सादर करण्याच्या या आदेशाला तत्कालीन आयुक्तांनी केराची टोपली दाखवली. नंतर तत्कालीन आयुक्त सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंत्यांनी लोकायुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला. परंतु हा अहवाल वस्तुस्थितीदर्शक नसल्याने तो लोकायुक्तांनी फेटाळत पुन्हा चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे मनपाने या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता गुणनियंत्रण मंडळाकडे पाच लाख रूपयांचे शुल्कदेखील भरले. चौकशीची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे दक्षता गुणनियंत्रण मंडळाने लोकायुक्तांना पत्राद्वारे कळवले आहे. परंतु चौकशी अहवाल वेळेत सादर केल्याने मनपा आयुक्तांसह बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना बुधवारी दुपारी मुंबईत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई
तत्कालीन शहर अभियंता विष्णू पालवे, एन. बी. मगर, उपशहर अभियंता आर. जी. सातपुते, इलेक्ट्रिकल सुपरवायझर बाळासाहेब सावळे, तत्कालीन लेखा वित्त अधिकारी पी. बी. कर्डिले, आर्किटेक्ट किरण कांकरिया यांच्यासह ठेकेदार अभय मुथा, बेस्ट कन्स्ट्रक्शन आर. आर. कपूर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. या सर्वांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी लोकायुक्तांकडे सुनावणीच्या वेळी करणार आहे. शाकीर शेख, तक्रारदार.
बातम्या आणखी आहेत...