आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महालक्ष्मी उद्यानात वाढले गाजरगवत; प्रवेश कमान पडली धूळ खात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाढलेले गाजरगवत, ओसंडून वाहणार्‍या कचराकुंड्या आणि गायब झालेल्या दिव्यांमुळे महालक्ष्मी उद्यानाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. महापालिकेने उद्यानाच्या या दुरवस्थेकडे डोळेझाक केल्याने नागरिकांची, विशेषत: मुलांची गैरसोय होत आहे.
बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यानात बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांची नेहमीच गर्दी असे. मात्र, काही दिवसांपासून ही गर्दी ओसरली आहे. तेथील दुरवस्थेमुळे नागरिकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. उद्यानातील हिरवळ नाहिशी झाली आहे. थोडाफार जो पाऊस झाला, त्यामुळे गाजरगवत वाढले आहे. या गवतामुळे विंचू व सापांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांना उद्यानात खेळण्याची भीती वाटते.
उद्यानातील कचराकुंड्यांचीही वाट लागली आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कचरा ओसंडून वाहत आहे. कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न नागरिकांना पडतो. मनपा कर्मचारी उद्यानात फिरकत नसल्याने कचराकुंड्या रिकाम्या करायच्या कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कचर्‍यामुळे उद्यानात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आसपासच्या नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवेशद्वारावरील उद्यानाच्या नावाची कमान गेल्या अनेक दिवसांपासून धूळ खात पडली आहे. ती उभी करण्याची तसदी मनपा कर्मचार्‍यांनी घेतलेली नाही. महालक्ष्मी उद्यानातील काही दिवेही गायब झाले आहेत. त्यामुळे रात्री तेथे अंधाराचे साम्राज्य असते.
उद्यान विभागातील आहे त्याच कर्मचार्‍यांमार्फत शहरातील सर्व उद्यानांची सुधारणा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मनपाने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते, परंतु महालक्ष्मी उद्यानाची सध्याची अवस्था पाहता ही मोहीम फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे वसुंधरा महोत्सवाच्या माध्यमातून मनपाच्या वतीने शहरभर वृक्ष लागवडीचा डंका वाजवण्यात येत आहे, तर दुसरीकडे उद्यानातील वृक्षांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.