आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prof. Shyam Manav Speak At Nagar On Superstitions

देव देवळात नव्हे, माणसाच्या मनात- प्रा. श्याम मानव यांनी केले प्रबोधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा करणे होय. उपाशी माणसाला खायला देणे, निरक्षर माणसाला शिक्षण देणे, ज्याला कपडे नाही, त्याला कपडे म्हणजेच माणसाची सेवा करणे होय. यातून देवाची सेवा घडते. देव देवळात नव्हे, तर माणसाच्या मनात राहते, हे संत गाडगेबाबा देत ते उदाहरण देऊन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आणि समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी नगरकरांचे प्रबोधन केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग समाजकल्याण आयुक्तालयाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या वतीने सोमवारी (५ जानेवारी) सहकार सभागृह येथे प्रा. मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अिनल कवडे, छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश विष्णू गायकवाड, जि. प. समाजकल्याण समिती सभापती मीरा चकोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रा. मानव म्हणाले, आपल्या देशात अनेक संत झाले. त्यांनी कधीही जादू केल्याचे आपल्या साहित्यात उल्लेख केला नाही. संत गाडगेबाबा यांची दोन उदाहरणे त्यांनी दिली. ते म्हणाले, गाडगेबाबा सांगायचे देव देवळात नव्हे, माणसाच्या मनात राहतो, देवळात देव राहत नाही, देवळात फक्त पुजाऱ्यांचं पोट राहतं. माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा करणे होय. यावेळी प्रा. मानव यांनी सत्यसाईबाबा कसे चमत्कार करून दाखवत होते. त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्यामागील हातचलाखीही सांगितली. हवेतून सोन्याची चेन काढणे, सोन्याची अंगठी निर्माण करणे, यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करणे आणि त्यामागील हातचलाखी समजावून सांगितली. लहान मुलांना व्यासपीठावर बोलावून भूत कसे काढले जाते, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. एका तांब्याच्या गडव्यामध्ये तांदूळ भरून त्यात एक त्रिशूळ टाकून संपूर्ण तांब्या उचलला गेला. यामागील विज्ञान त्यांनी सांगितले.

चिमुकल्यांकडूनही ते करवून घेतले. एकूणच छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रा. मानव यांनी चमत्कार व अंधश्रद्धा दूर केली. शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा नेमका काय सांगतो, याबाबत सांगितले. तसेच जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. चमत्कारालाच नमस्कार करण्याची पद्धत आहे. त्यामुळे भारतात ढोंगीबाबांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ढोंगीबाबांचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानवी मनात खोलवर रुजल्या आहेत. परंतु एखादा बाबा हवेत हात फिरवून कुठलीही वस्तू कशी निर्माण करतात, आपल्या मंत्रोच्चाराने अग्नी कसा प्रज्वलित करता येतो. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या अंगात शिरलेले भूत कसे उतरवण्याचे सोंग केले जाते, हे प्रा. मानव यांनी प्रात्यक्षिकांसह सादर केले. मानव यांचे प्रबोधन आणि त्यांचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक पाहिल्यावर उपस्थित नागरिकांच्या डोक्यातील भूतही पळाले. जिल्हाधिकारी कवडे यांनी आज जादूटोणा विरोधी कायद्याची किती गरज निर्माण झाली आहे, याचे महत्त्व सांगितले. कायद्याबाबत जागृती नसेल, तर कुठलाही कायदा प्रभावीपणे अंमलात येऊ शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्तािवक सुरेश झुरमुरे यांनी केले.

दारिद्र्य दूर करणे ही मोठी समस्या
स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण देताना प्रा. मानव म्हणाले, विवेकांनदांना देवाबाबत विचारले असता, ते म्हणाले, देव त्यांचीच मदत करतो. जे स्वत:ची मदत करतात. देशातील सर्वात मोठी समस्या दारिद्र्य दूर करणे ही आहे. धार्मिक माणसांनी धर्मकार्य, देवकार्यात खर्च होणारा वेळ दारिद्र्य दूर करण्यासाठी, खर्च करण्यासाठी केला, तर देशातील दारिद्र्य दूर होईल.

प्रा. मानव यांच्या ३५ जिल्ह्यांत सभा
जादूटोणा विरोधी कायद्याबाबत संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला अाहे. प्रा. मानव यांच्या ३५ जिल्ह्यांमध्ये सभा होणार आहेत. यानंतर प्रत्येक शाळांमध्ये जागृती करण्यात येईल. हा कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना दक्षता अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे, त्यांना या कायद्याची जाणीव व्हावी, यासाठी कायद्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल.