आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Project Affected Rehabilitation People Fund Granted

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 1200 कोटींचे पॅकेज : मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा - बहुचर्चित गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या उभारणीत विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 1200 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली. पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कार्यालयासह 120 अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, राज्यमंत्री राजेंद्र मुळूक, खासदार मुकूल वासनिक यांच्यासह प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकार निधी देत असले तरी पुनर्वसनासाठी राज्यानेच निधी द्यावा, असे केंद्राचे धोरण आहे. राज्याचे सिंचन विभागाचे बजेट 6 ते 7 हजार कोटी रुपये असून त्यात पुनर्वसनावर खर्च करणे अशक्य आहे. मात्र गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी अतिरिक्त निधी देण्याचे सरकारने ठरविले असून त्यात मंत्रिमंडळही लवकरच मंजूरी देईल.

केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडून त्यांना न्याय देण्याची मागणी केली. प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्प प्रलंबित राहिला. या प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारने पुनर्वसन योजना आखावी, अशी मागणीही त्यांनी केली.

नोकरीऐवजी पैसे देणार
प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी एकरकमी अनुदानाची तरतूद नवीन पॅकेजमध्ये असणार आहे. सोबतच गोठा बांधण्यासाठी व वाढीव कुटुंबाच्या घर बांधणीसाठी अनुदान दिले जाईल. भूमिहीन शेतमजुरांना रोख रक्कम दिली जाणार असून गोसीखुर्द धरणात मासेमारी व्यवसाय करण्यासाठी मासेमारी सोसायट्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.