आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार न मिळाल्याने परिचारिकेचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - अकोले येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मवेशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका ज्योती औताडे (४९) या राजूर बसस्थानकात मंगळवारी (३१ मार्च) सकाळी नऊच्या सुमारास चक्कर येऊन पडल्या. त्यांना ताबडतोब राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे योग्य उपचार करण्यात आले नाही. बराच वेळ उपचाराशिवाय गेला. तेथून अकोले येथे नेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

प्रशिक्षणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचारी परिचारिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत चौकशीची मागणी केली. राजूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरच याला जबाबदार असून आरोग्य कर्मचारीच उपचारांअभावी मरण पावतो, तर सामान्य लोकांचे काय? असा प्रश्न परिचारिका संघटनेने केला आहे.

संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे, प्रशिक्षणाला निघालेल्या औताडे राजूर स्थानकावर बसची वाट पहात होत्या. चक्कर येऊन त्या खाली पडल्या. त्यांच्याबरोबर असलेल्या देशमुख यांनी तातडीने १०८ नंबरला फोन केला. पण रुग्णवाहिका अर्ध्या तासानंतर आली. औताडे यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे केवळ सलाइन लावण्यात आले. औताडे यांचा रक्तदाब खूप वाढला होता. त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत. अकोले येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यासही उशीर लावण्यात आला. रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय खंडागळे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने फोन करून रुग्णवाहिका देण्यास सांगितले. नंतर त्यांना अकोले येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्या मरण पावल्याचे खासगी डॉक्टराने सांगितले.

राजूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारास उशीर केल्याने औताडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत चौकशीची मागणी महिला आरोग्य कर्मचारी वर्गाने केली. या दुर्दैवी घटनेमुळे तालुका आरोग्य अधिकारी संजय खंडागळे यांनी प्रशिक्षणाला सुटी दिली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पिळवणूक
आदिवासीग्रामीण भागात राहणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची सतत उपेक्षा केली जाते. वैद्यकीय अधिकारी त्यांची पिळवणूक करतात. कर्मचारी २०० किलोमीटरवरून नोकरीच्या ठिकाणी येतात. कामात थोडी हयगय झाली, तरी निलंबनाचे आदेश दिले जातात. त्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहेत, असे आरोग्य कर्मचारी ए. डी. रोकडे अन्य परिचारिकांनी सांगितले.