आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Properity Of Sujata Wafare Name On Sampada Credit Society

सुजाता वाफारे यांच्या मालमत्तेवर ‘संपदा पतसंस्थे’चे नाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेचा संस्थापक ज्ञानदेव वाफारे याची पत्नी व संस्थेची तत्कालीन संचालक सुजाता वाफारेंच्या सावेडीतील सिद्धिविनायक सोसायटीतील मालमत्तेवर संपदा पतसंस्थेचे नाव लावण्यात आले आहे. वाफारेसह इतर संचालकांच्या मालमत्तांवर संस्थेचे नाव लावण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे.

संपदा पतसंस्थेच्या तत्कालीन संचालकांची सहकार कायदा कलम 88 नुसार चौकशी सुरू आहे. कारवाईपूर्वी संचालक मातमत्तेची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असल्याचा अहवाल प्रशासक मंडळाने जिल्हा उपनिबंधकांना पाठवला होता. त्यावर उपनिबंधकांनी कलम 95 नुसार अधिकारांचा वापर करून तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. सुजाता वाफारे यांच्या मालकीच्या सावेडीतील सिद्धिविनायक गृहनिर्माण सोसायटीतील घरावर पहिली टाच पडली. या घराच्या कागदपत्रांवर संपदा पतसंस्थेचे नाव लावण्यात आले आहे. ज्ञानदेव वाफारेच्या सारसनगर परिसरातील दोन गुंठे जागेवरही संस्थेचे नाव लावण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित संचालक हसन अमीर राजे, सुधाकर परशुराम थोरात, उत्तम दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, भाऊसाहेब कुशाबा झावरे, बबनराव देवराम झावरे, लहू सयाजी घंगाळे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे यांच्या मालमत्तांवर संस्थेचे नाव लावण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी संचालकांची मालमत्ता असलेल्या ठिकाणच्या तलाठय़ांशी संपर्क साधण्यात आला आहे. संचालकांनी मालमत्तेचे रकमेइतके अथवा निश्चित करण्यात आलेल्या जबाबदारीच्या रकमेइतके तारण संस्थेकडे अनामत म्हणून एक महिन्याच्या आत जमा केल्यास जप्तीचे आदेश रद्द होतील.
प्रशासकांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ
गुलमोहोर रस्त्यावरील संस्थेच्या दोन गाळ्यांची लिलाव प्रक्रिया वादात सापडल्याने हा लिलाव रद्द करण्यात आला. मात्र, लिलाव घेणारे जयंत मच्छिंद्रनाथ जाधव यांनी बेकायदेशीरपणे दोन्ही गाळे फर्निचरसह ताब्यात ठेवल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधीक्षकांसमोर गाळ्याच्या मालकीबाबत सुनावणी सुरू असून निर्णय प्रलंबित आहे. त्या ठिकाणी असलेले संस्थेचे दफ्तरही गायब झाले आहे. प्रशासक मंडळाने या संदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, पोलिसांनी याची फिर्याद घेतली नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही तोफखाना पोलिसांनी दाद दिली नसल्याचे प्रशासक मंडळाकडून सांगण्यात आले.