आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता कर भरूनही आम्ही नागरी सुविधांपासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 84 बाळकृष्णनगर परिसरात असलेल्या एम्रॉल्ड सिटीजवळील नाथ प्रांगण समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसल्याने पावसाच्या पाण्याचे डबके साचत आहे.नागरिक आणि लहान मुलांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. नगरसेवक आणि मनपा प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. मालमत्ता कर भरूनही नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वसाहतीत शंभराहून अधिक घरे आहेत. या परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण अनेक दिवसांपासून रखडले आहे. मातीचा रस्ता असल्याने खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. या भागात धारेश्वर शिक्षण संस्थेची प्राथमिक व माध्यमिक शाळा असून शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. जागोजागी पाण्याचे डबके साचल्यामुळे डास, दुर्गंधी वाढलेली आहे. उच्चभ्रू वसाहत असतानाही याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जलवाहिनी टाकलेली नसल्यामुळे पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी बोअरवेलचे किंवा टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. नाथ प्रांगणात पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात महिलांना बाहेर पडणे अशक्य होत आहे. चोरट्यांची भीती वाढली आहे. समस्यांकडे नगरसेवकही लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वसाहतीतील समस्यांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष
या परिसरात जलवाहिनी टाकण्यात आलेली नाही. खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. साफसफाई कर्मचारी स्वच्छता करत नाही. वसाहतीतील समस्यांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण व्हायला हवे.
गिरीश खोचे, रहिवासी
चार वर्षांपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचलेले आहेत. यावर नगरसेवकांनी लक्ष घातले पाहिजे.
बबन शिंदे, रहिवासी
पंचवीस हजार रुपये खर्च करून नळ कनेक्शन घेतले. परंतु पाणी येत नाही. आम्ही मालमत्ता कर भरतो. तरीसुद्धा चांगला रस्ता आणि नागरी सुविधा आम्हाला मिळत नाही.
शकुंतला तांदळे, रहिवासी
रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु नागरिकांनी वाद घातला. त्यामुळे आम्ही दुसरा रस्ता तयार केला. दिवाळीपर्यंत रस्ता होईल. समांतर योजना झाल्याशिवाय त्यांना पाणी देता येणार नाही. पथदिवे नवीन लावून देण्यात येईल.
पंकज भारसाखळे, नगरसेवक