आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Proposal Of Rupees 2256 Crore For Sai Samadhi Shatabhdi

साई समाधी शताब्दीसाठी 2256 कोटींचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- सन 2018 मध्ये साज-या होणार्‍या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने 2256 कोटींचा निधी शिर्डी नगरपंचायतीस उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव नगराध्यक्ष सुमित्रा कोते यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. या वेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार बाळासाहेब विखे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

या प्रस्तावात म्हटले आहे की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असून देश-विदेशांतून लाखो भाविक साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. उत्सव काळात मोठी गर्दी होत असल्याने संस्थान आणि नगरपंचायतीच्या विविध यंत्रणांवर मोठा ताण पडतो. समाधी शताब्दी वर्षात, तर वर्षभर साईभक्तांचा कुंभमेळाच शिर्डीत भरणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य, साफसफाई, रस्ते, भुयारी गटार, पथदिवे, वाहनतळ, शहर सुशोभीकरण, पालख्यांची व्यवस्था, पाणी व आरोग्य व्यवस्था, लक्ष्मीनगर नाला सुशोभीकरण आणि नाले साफसफाई आदी कामे हाती घेणे आवश्यक आहे. शिर्डी नगरपंचायत ‘क वर्ग’ असल्याने सरकारच्या मदतीशिवाय साईभक्तांना नागरी सुविधा देणे जिकिरीचे बनणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमांतून शिर्डीच्या विकासाला सुमारे 2256 कोटी उपलब्ध करून द्यावेत.

रस्ते विकसित करण्यासाठी 200 कोटी, भुयारी गटार योजनेसाठी 300 कोटी, प्राथमिक आरोग्य, सुविधा, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन यासाठी 100 कोटी, पथदिवे, हायमास्टसाठी 1 कोटी, वाहनतळ व्यवस्था, आरक्षण, भूसंपादन यासाठी 200 कोटी, नाला सुशोभीकरण, साफसफाई यासाठी 100 कोटी, पाणीपुरवठा व्यवस्था, विविध प्रभागांमध्ये पिण्याच्या जलवाहिन्या यासाठी 5 कोटी, धरण ते साठवण तलावात थेट जलवाहिनीसाठी 300 कोटी, राहाता ते सावळी विहीर या 12 किलोमीटर अंतराच्या उड्डाणपूल निर्मितीसाठी 550 कोटी, शिर्डी विकास आराखड्यातील आरक्षण विकसित करण्यासाठी व भूसंपादनासाठी 500 कोटी आदी कामांचा प्रस्तावात समावेश आहे.