आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये पोलिसांना न जुमानता वेश्याव्यवसाय सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा बसस्थानक व तीन क्रमांकाच्या बसस्थानकाबाहेर नगर-औरंगाबाद महामार्गाचा पादचारी रस्ता सध्या वेश्यांचा अड्डा बनले आहेत. दररोज अंधार पडू लागला, की या व्यवसायाला चांगलाच बहर येतो. आंबटशौकिनांचे पाय आपोआप या अड्ड्यांकडे वळू लागतात. विशेष म्हणजे पोलिसांना मात्र या अवैध व्यवसायाची कुठलीही गंधवार्ता नाही. त्यामुळे पोलिसांना आव्हान देत शहरात सध्या वेश्याव्यवसाय तेजीत सुरू आहे.

माळीवाडा बसस्थानकातील जिल्हा परिषदेच्या बाजूचा कोपरा, पाठीमागील बाजूला असलेले शहर बससेवेचे जुने स्थानक, जिल्हा परिषद कार्यालयासमोरील शहर बसचा थांबा, नगर-औरंगाबाद महामार्ग व बसस्थानकाला लागून असलेला पादचारी मार्ग, तसेच तीन क्रमांकाच्या बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या विरुद्ध बाजूला या वेश्या मध्यरात्रीपर्यंत उभ्या असतात. पेहरावावरून प्रवासी वाटत असल्यामुळे या महिला वेश्या असल्याचे लक्षात येत नाही. सायंकाळी अंधार पडल्यापासून या महिला रात्री उशिरापर्यंत तेथेच रेंगाळत असतात. त्यामुळे नंतर मात्र त्या तेथे कशासाठी उभ्या आहेत, हे लक्षात येते.

नगरमध्ये पर्यटन व्यवसाय फारसा तेजीत नाही. साहजिकच शहरात बाहेरून मुक्कामाकरिता येणाºया प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने पोलिसांसोबत संगनमत करून काही लॉजचे मालक अवैध धंद्यांचा आश्रय घेत आहेत. आंबटशौकिनांचे नको ते चोचले पुरवण्यासाठी काही लॉजवर अवैध धंदे जोरात सुरू आहेत.

गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी काही लॉजमालक पैसे कमावण्याचा सोपा मार्ग पत्करतात. तो म्हणजे बाहेरून आलेल्या जोडप्याला लॉजवर जागा देऊन त्यांच्याकडून तासाला भरमसाट पैसा घेणे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाकडे पोलिसांचे मात्र लक्ष नाही, हे विशेष. वर्षभरापूर्वी एका प्रशिक्षणार्थी महिला पोलिस उपअधीक्षकाने बारातोटी कारंजा परिसरात एका लॉजवर धाड टाकून तेथील अवैध वेश्या व्यवसाय उजेडात आणला होता. त्यानंतर या परिसरात एकही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ शहरात वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद आहे, असे नव्हे. पोलिसांना माहीत असूनही या अवैध वेश्या व्यवसायाकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

अवैध व्यवसायांवर कारवाई करू
जिल्ह्यातील अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत. गुंडांचे कोंबिंग आॅपरेशन, फरार आरोपींना पकडण्याची मोहीम सुरू आहे. अलीकडेच स्थानिक गुन्हे शाखेने चास शिवारात हॉटेल संजय पॅलेसवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उजेडात आणला. त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरू आहे. ‘कोतवाली’च्या हद्दीत अवैध वेश्या व्यवसाय सुरू असेल तर कारवाई करू. त्यासाठी पोलिसांची गस्त वाढवू. कठोर कारवाईही केली जाईल.’’ शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक.