आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंच्या हल्लेखोरांचा तपास न लागल्यास २३ पासून आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुरोगामी विचारवंत, श्रमिकांचे कैवारी, कामगार आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क़ॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे राज्यातील कायद्याच्या राज्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
परिवर्तनवादी शक्तींशी व नेत्यांशी विचारांची लढाई वैचारिक पातळीवर लढता येत नसल्याने त्यांना संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे. शासनाने पानसरे यांच्या हल्लेखोरांचा तातडीने तपास लावून अशा मनोवृत्तीला पायबंद घालावा.
पुरोगामी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिस सरंक्षण द्यावे, पानसरे यांच्यावरील हल्लेखोरांचा तपास न लागल्यास २३ फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा डाव्या-पुरोगामी पक्ष संघटना कृती समिती, स्वयंसेवी संस्थांचा महासंघातर्फे देण्यात आला.
पानसरे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याचा डाव्या-पुरोगामी पक्ष संघटना कृती समिती, स्वयंसेवी संस्थांचा महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी स्वयंसेवी संस्था महासंघाचे डॉ.गिरीष कुलकर्णी, रोहित परदेशी, शिवराज्य ग्रुपचे बाळासाहेब वारुळे, भारत नवनिर्माण अभियानचे मिलिंद चावरे, विकास सुतार, अजित कुलकर्णी, ज्ञानेश्वर गडाख, जिल्हा डाव्या-पुरोगामी पक्ष संघटना कृती समितीचे बाबा आरगडे, सुधीर टोकेकर, मेहबूब सय्यद, आनंदराव वायकर, अनिल भोसले, अनंत लोखंडे, पत्रकार सुधीर लंके, बाळासाहेब सुरुडे, सचिन आल्हाट, सचिन मोकळ, शंकरराव घुले, अजय बारस्कर, दिगंबर भोसले, महादेव पठारे. अरविंद गेरंगे, पोपटराव जाधव, बाळासाहेब कांबळे, संजीव भोर, शाकीर शेख, प्रवीण सोनवणे, कुणाल शिरसाठे, बाळासाहेब गायकवाड आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देऊन मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.
निषेधानंतर कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले. पानसरे यांच्यावरील हल्लाची घटना निंदनीय आहे. हा हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. तरीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली.
आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येईल

^विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजून सापडत नाहीत. ७२ तासांत हल्लेखोरांना पोलिसांनी अटक न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. आमचे आंदोलन हे लोकशाही मार्गाने असेल.'' डॉ. गिरीश कुलकर्णी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था महासंघ.