आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोडग्या अभावी 25 दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी संपावरच, मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासन दरबारी तोडगा निघत नसल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेसमोर हजारो महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार अडवून ठिय्या आंदोलनही करण्यात आले. पोलिसांनी मात्र, आंदोलकांना अटक केली नाही.
 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ आहार शुल्क वाढीसह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करूनही शासनस्तरावरून दुर्लक्ष केले जात आहे. कृती समितीच्या नेतृत्वाखाली ११ सप्टेंबरपासून राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाड्यांपैकी अजूनही सुमारे पावणेपाच हजार अंगणवाड्या बंद आहे. बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने आशा सेविकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अजूनही प्रशासनाला यश आले नाही. दरम्यान शासनदरबारी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी मागण्यांबाबत वेळोवेळी चर्चा केली. पण त्याची दखल अद्यापि शासनस्तरावरून घेण्यात आली नाही. शासनाने नुकतीच दिड हजार रुपयांची मानधन वाढ केली, पण ही वाढही अत्यल्प असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत संबंधित समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी कृती समितीने लावून धरली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनांतर्गत राज्यात सुमारे चार लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तुटपुंजे मानधन असूनही कर्मचाऱ्यांवर अनेक कामांचा बोजा देण्यात आला आहे. शासनस्तरावरून आंदोलन शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तथापि कर्मचारी मागण्यांवर ठाम आहे. महिलांची एकजूट सरकारला घाम फोडणारी आहे. जिल्हा परिषदेसमोर ‘हम सब, एक है ’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी पोलिसांनाही अटक करा, असे आव्हान दिले. परंतु, पोलिसांनी संपूर्ण प्रकरण संयमाने हाताळून कोणालाही अटक केली नाही. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने, मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांना पाठवण्यात आले. 
 
पुढील आंदोलनाची दिशा ठरवू 
वेतनाबाबत दिलेल्या शिफारशींची सरकारने अंमलबजावणी करावी. शासनदरबारी चर्चा होऊनही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे आम्ही जेलभरोच्या तयारीने आंदोलन केले. पोलिसांनाही अटक करा असे आवाहन केले. पण त्यांनी असमर्थता दर्शवली. कृती समिती पुढील दिशा ठरवणार आहे. 
- राजेंद्र बावके , कृती समिती 
 
महिला बालकल्याण यंत्रणाच कोलमडली 
महिला बालकल्याण विभागांतर्गत जिल्हाभरात अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या पोषणासह विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. पण सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असले तरी बालकल्याण यंत्रणा कोलमडली असून अंगणवाड्या बंद आहेत. 
बातम्या आणखी आहेत...