आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराच्या निषेधार्थ पाथर्डीत बंद, रास्ता रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - मोहरी येथील अल्पवयीन गतिमंद मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या पुढाकाराने सोमवारी आयोजित सर्वपक्षीय मूकमोर्चा शहर बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वसंतदादा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेपुढे माणिकदौंडी चौकात रास्ता रोको आंदोलन करुन पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
आंबेडकर पुतळ्यापासून मूकमोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड, मनसेचे देविदास खेडकर, भाजपचे माणिक खेडकर, काँग्रेसचे मिठूभाई शेख, राष्ट्रवादीचे सीताराम बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ, गोसावी समाजाचे श्रीधर गिरी, सदाशिव पुरी, ज्ञानेश्वर गिरी, हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाड्याचे जिल्हा युवा सचिव अ‍ॅड. भरत गोसावी, नेताजी प्रतिष्ठानचे राम लाड आदी सहभागी झाले. मोर्चकऱ्यांच्या वतीने पाच मुलींनी प्रभारी तहसीलदार जयसिंग भैसडे यांना निवेदन देण्यात आले.

ज्येष्ठ नेते सहदेव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांना पूर्वकल्पना देऊनही पुरेसा बंदोबस्त नसल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकाशी चर्चा केली. यावेळी शिरसाठ म्हणाले, शहर तालुक्यात पोलिसांचे अस्तित्व जाणवत नाही. अवैध धंदे, चोऱ्यांना उत आला आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारत आरोपीला कठोर शासन आर्थिक मदत मिळण्यासाठी निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

ग्रामपंचायत अकोला, मोहरी, मोहटे, गोसावी समाज, आम आदमी पक्ष, नेताजी प्रतिष्ठान यांच्यासह विविध ग्रामपंचायती, महिला संघटना, सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी घटनेचा निषेध करत आरोपीला फाशी व्हावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत संरक्षण मिळावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. दरम्यान, आरोपीच्या अल्पवयीन मुलाने अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

मोहरी येथील गतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी सर्वपक्षीयांतर्फे पाथर्डी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. छाया : संजीव कुटे.

भाषणबाजी अन् शाब्दिक चकमक
मोर्चादरम्यान भाषणबाजीवरुन सकल मराठा समाज ओबीसी समाजातील नेत्यांसह अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.मराठा समाजातील काहींनी भाषणबाजीपासून रोखण्याचा प्रयत्न करताच संतापलेले आम आदमी पक्षाचे आव्हाड यांनी "तुमच्यापेक्षा संख्येने आम्ही जास्त आहोत. आम्ही भाषण करणार' असे सांगताच तणाव निर्माण झाला.

दंगल, गोळीबाराची अफवा
आंदोलन सुरू असताना पोलिस उपअधीक्षक शिवथरे साध्या वेशात पाथर्डीत आले. वरिष्ठांच्या आगमनाची माहिती मिळताच ते लगेच गणवेश बदलण्यासाठी शेवगावला गेले. त्या काळात स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांवरील दबाव संपला. त्याचा परिणाम शहरात गोळीबार, दंगल, वाहनांची मोडतोड झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.
बातम्या आणखी आहेत...