आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी रोखण्यासाठी साई मंदिरासमोर आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना खतपाणी घालणार्‍या पोलिसांचा निषेध करत गुरुवारी सर्व पक्ष, संघटना आणि ग्रामस्थांनी साई समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पाच दिवसांत बदल दिसला नाही, तर पोलिस ठाण्याला टाळे ठोकण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

पोलिसांचे अभय असल्यामुळेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शिर्डी-शनिशिंगणापूर अवैध प्रवासी वाहतुकीचा लाखोंचा मलिदा पोलिसांना मिळतो. त्यामुळे रस्त्यांवर एजंटगिरी बोकाळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पाकिटमारांच्या टोळ्या सक्रिय झाल्याने याचा फटका अन्य राज्यांतून आलेल्या साईभक्तांना बसतो. दोन दिवसांपूर्वी प्रतिकार करणार्‍या साईभक्ताला पाकिटमारांनी मारहाण केली, तसेच साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकांवरही दगडफेक केली.

या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शिर्डी परिसरातील गावांमध्ये साईभक्तांनी भजन, कीर्तन, स्तवन मंजिरीचे सामुदायिक पठण केले. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

(फोटो - शिर्डी संस्थानच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको करताना शिर्डी ग्रामस्थ)