आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पब्लिसिटीसाठी अफवांचे नियोजन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांनी इतर पक्षांची वाट धरली, अशा अफवांचे पीक सध्या जिल्ह्यात जोमाने वाढत आहे. हा त्याच नेत्यांचा पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा आहे. काही नेतेही खासगीत याला दुजोरा देत आहेत.
शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांकडून नवनवे फंडे अजमवले जात आहेत. जास्तीत जास्त चर्चेत राहून त्याचा उपयोग उमेदवारी मिळवण्यासाठी करायचा, असे नियोजन नेत्यांनी आखले आहे.
दोन दिवसांपूर्वी शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. उत्तरेतील जागा राखीव असल्याने वाकचौरेंकडे हुकमी एक्का म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. उत्तरेत काँग्रेसची यंत्रणा मजबूत असून तेथे मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आहे, पण जागा राखीव असल्याने वाकचौरेंना आपल्या पक्षात खेचून उमेदवारीची गळ घालण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याने वाकचौरेंची दिल्ली दरबारी र्शेष्ठींची भेट घालून दिली. त्यामुळे वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पण ही अफवा असल्याचे वाकचौरेंनीच स्पष्ट केल्याने या चर्चेवर पडदा पडला असला, तरी अफवांचे पीक आहेच.
दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलारदेखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्यांनीही ही अफवाच असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने काही राजकीय जाणकार, तसेच पक्षांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. अफवा पसरवून चर्चेत राहण्यासाठी या नेत्यांच्या बगलबच्च्यांनीच या अफवा पसरवल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे अफवा पसरवायची आणि सांगायचे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, असा दुहेरी फंडा वाकचौरे व शेलारांकडून अजमावला जात आहे. यासंदर्भात वाकचौरे यांच्याशी संपर्क झाला नाही.
गडाखांच्या नावाची चर्चा
राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आमदार बबनराव पाचपुते व राजीव राजळे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही नेत्यांविषयी पक्षात दोन मतप्रवाह आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाखांनी राजळेंना पाठिंबा दिला असला, तरी राजळे व पाचपुतेंऐवजी समतोल व सर्वमान्य पर्याय म्हणून गडाखांचेच नाव कार्यकर्त्यांकडून पुढे केले जात आहे.