आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे व नगर तहसीलदारांचे बनावट शिक्के हस्तगत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाखाली कामगारांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याच्या प्रकरणात खळबळजनक बाबी समोर येत आहेत. पोलिसांनी धनलक्ष्मी पतसंस्थेच्या कार्यालयातून पुणे व नगर तहसीलदारांचे बनावट शिक्के हस्तगत केले आहेत. पतसंस्थेच्या दोन एजंटांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन ही राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग असल्याचे भासवून युनियनचे अध्यक्ष विजयदादा पाखरे यांनी नगरसह ठाणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत कामगारांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवले. यासाठी सुरूवातीला सभासद शुल्कापोटी बारा हजार रूपये गोळा करण्यात येत होते. नगर येथील युनियनचे सचिव वसंत पवार यांनी या प्रकल्पासाठी सभासद जमा करण्याची जबाबदारी उचलली होती.

या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले.राष्ट्रवादी पक्षाच्या नावाखाली पवार लोकांची फसवणूक करत असल्याची तक्रार महापालिकेतील विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुधे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पवारला अटक झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल पाटील करत आहेत.

गुलमोहोर रस्त्यावरील पवार यांच्या धनलक्ष्मी पतसंस्थेच्या कार्यालयातून सभासद बनवण्याच्या घडामोडी सुरू होत्या. पोलिसांनी रविवारी या कार्यालयातून पुणे व नगर तहसीलदारांचे बनावट शिक्के जप्त केले. रमेश पगारे व गणेश कदम या दोन एजंटांना अटक करण्यात आली. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले.

प्रथमवर्ग न्यायालयाने या दोघांना 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. प्रत्येकी 50 पावत्या असलेल्या सदस्यत्वासाठीची 10 पावतीपुस्तकेही जप्त करण्यात आले आहेत. युनियनच्या आमिषाला बळी पडलेल्यांची संख्या 55 वर पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. तहसीलदारांचे बनावट शिक्के कशासाठी बनवण्यात आले आहेत, याचा तपास सुरू आहे. युनियनचे अध्यक्ष पाखरे यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एजंटला बनवले संचालक!

प्रकल्पासाठी सभासद जमा करण्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारा धनलक्ष्मी पतसंस्थेचा एजंट रमेश पगारे याला पंधरा दिवसांपूर्वीच वसंत पवारने पतसंस्थेचा संचालक बनवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच अकोले तालुक्यातील वसंत पवार पक्षाच्या नावाखाली गंडवत असल्याचे हे प्रकरण आणखी गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे.