आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University News In Marathi, Examination Department, Students, Divya Marathi

परीक्षा विभागावरून पुणे विद्यापीठ्याच्या अधिसभेत रणकंदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर / पुणे - लक्षावधी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभाराविरोधात पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शनिवरी रणकंदन माजले. परीक्षा विभागाच्या नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांना हटवण्याची जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. अधिसभेतील हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरू होता.


पुणे विद्यापीठांतर्गत येणार्‍या अहमदनगर, तसेच सोलापूर येथील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे असते. ऑनलाइन अर्जप्रक्रिया, निकालाची पद्धत, निकालांना होणारा विलंब, हॉल तिकिटाचा गोंधळ, प्रश्नपत्रिकांमधील चुका, पुनर्मूल्यांकनातील संशयास्पदता, अपंग विद्यार्थ्यांना सवलती न देणे, छायांकित प्रतींसाठी होणारा अतिविलंब अशा अनेक तक्रारींचा पाढाच विद्यापीठाच्या अधिसभेत सदस्यांनी वाचला. खुद्द कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनीही आपल्या अभिभाषणात परीक्षा विभागाच्या कारभाराविषयीची नाराजी बोलून दाखवली. कुलगुरूंचे भाषण सकाळी अकरा वाजता सुरू झाले. त्यानंतर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये वेगळी करण्याचा प्रस्ताव मांडला गेला. त्यावरील चर्चेपूर्वीच संतोष ढोरे यांनी परीक्षा विभागाचा मुद्दा प्रस्तावाच्या रूपाने मांडला. नगरचे अरुण पंधरकर, युवराज नरवडे, विद्या वाजे, रवींद्र चोभे, अप्पासाहेब ठुबे यांनीही चर्चेत भाग घेतला.


पंधरा दिवसांत कारवाई
परीक्षा विभागाच्या गलथान कारभाराला जबाबदार असणार्‍या व्यक्तींविरोधात येत्या पंधरा दिवसांत कारवाई केली जाईल. त्यासाठी विद्यापीठेतर दोन आणि विद्यापीठातील काही व्यक्तींची समिती स्थापन केली आहे. माझ्याही भावना या मुद्दय़ाविषयी तीव्र आहेत. ’’ डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, पुणे विद्यापीठ


गलथान कारभारामुळे बदनामी
परीक्षा विभागाच्या ढिसाळ, गलथान कारभारामुळे पुणे विद्यापीठ बदनाम होत आहे. परीक्षा विभागावर नियंत्रक संपदा जोशी यांचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यांना तातडीने हटवण्यात यावे अथवा सक्तीच्या रजेवर पाठवावे. परीक्षा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसत आहे.’’ शिवाजी साबळे, अधिसभा सदस्य, पुणे विद्यापीठ


विद्यापीठाकडून लूट
विद्यापीठाकडून गुणपडताळणी आणि पेपरच्या फोटोकॉपीसाठी आर्थिक लूट होते. याबाबत छात्रभारतीने आवाज उठवला होता; पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी सभेत आवाज उठवलाच पाहिजे. त्यांनी सामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे. ’’ केदार भोपे, शहर जिल्हाध्यक्ष, छात्रभारती विद्यार्थी संघटना