नगर - फोटोकॉपीच्या नावाखाली पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचा आरोप करत छात्रभारती व युगंधर युवा प्रतिष्ठानने दोन दिवसांपासून आंदोलन पुकारले होते. सोमवारी दुपारी कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी फोटोकॉपीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
सोमवारी या दोन्ही संघटनांच्या वतीने पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात सहा तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. नंतर कुलगुरुंनी दूरध्वनीवरून या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. 5 मार्चला होणार्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यावर निर्णय होईल, असे लेखी आश्वासन देण्याचे कुलगुरुंनी मान्य केले. विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक ए. एस. जाधव यांनी तसे लेखी निवेदन संघटनांना दिले. त्यानंतर छात्रभारती व युगंधर प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.
आंदोलनात छात्रभारतीचे शहरप्रमुख केदार भोपे, युगंधरचे अध्यक्ष प्रदीप ढाकणे, गजानन भांडवलकर, युवराज सांगळे, भरत वाकळे, नितीन लवांडे, मंदार पलसकर आदी विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.