आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quality People Get Chance In Maharashtra Election

विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना प्राधान्य - आमदार चंद्रकांत पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यात पंधरा वर्षांनंतर शिवसेना-भाजपची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असेल अशांनाच संधी दिली जाईल. कुठल्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय अथवा डावलले जाणार नाही किंवा कुणाला लादलेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण निरीक्षक व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरीक्षक व आमदार माधुरी मिसाळ, अभय आगरकर, सुनील रामदासी आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 80 हजार बूथ तयार करण्यात आले आहेत. 68 हजार बूथ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांचा सर्वसाधारण कल काय आहे. गेल्या निवडणुकीत मतदारसंघात काय स्थिती होती याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. अनेकांनी मुलाखती दिल्या. त्यांचे बायोडाटे घेतले असून, ते प्रदेशला सादर करण्यात येणार आहेत. प्रदेशने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याचे काम चाणक्य या खासगी एजन्सीला दिले आहे.
ही एजन्सी सर्व मतदारसंघात सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, अर्थमंत्री अरुण जेटली हे अहवाल पाहून उमेदवार निश्चित करणार आहेत. सेना-भाजप समझौता झाल्यानंतर त्यांनी आम्हाला वाढवून दिलेल्या जागा आम्ही निश्चितच जिंकू. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. भाजपला 130 जागा मिळतील. नगर जिल्ह्यातील सेनेच्या 7 जागांपैकी एक जागा मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचे नाव निश्चित झाले असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचे नाव जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.

श्रीगोंदे येथील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले घनश्याम शेलार, नेवाशाचे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, सचिन देसरडा, श्रीगोंदे येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषद सदस्य राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार, शेवगाव येथील राष्ट्रवादीचे दिलीप लांडे, संगमनेर येथील सुधीर पोखरकर यांनी शासकीय विश्रामगृहावर निरीक्षक पाटील व मिसाळ यांची भेट घेतली. हे सर्वजण भाजपकडून इच्छुक असले, तरी त्यांच्यापैकी एकानेही अजून अधिकृत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही.