आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil News In Marathi, Nationalist Congress, Uddhav Thackeray, Shiv Sena

साखळदंडाने बांधले तरी शिवसैनिक थांबणार नाहीत, आबांची उद्धव यांच्यावर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना संपत चालली आहे. उद्धव ठाकरे यांनी भावनिक शिवबंधन बांधले आहे. मात्र, साखळदंडाने बांधले तरी शिवसैनिक आता शिवसेनेत राहणार नाहीत, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी कर्जत तालुक्यातील राशिन येथे बोलताना केली.


काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत गृहमंत्री पाटील बोलत होते. या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, परमवीर पांडुळे, प्रवीण घुले, सुरेखाराजे भोसले, बाबासाहेब जगदाळे, सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण पाटील, संभाजीराजे भोसले, राजेंद्र देशमुख, राजेंद्र गुंड, अंबादास पिसाळ, शाहुराजे भोसले, धनराज कोपनर, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, दीपक शिंदे, नितीन धांडे, दादासाहेब सोनमाळी, बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर, विजय मोढळे, शिवाजीराव अनभुले, माणिकराव मोरे, माधुरी लोंढे, कांचन खेत्रे, डॉ. पंढरीनाथ गोरे, माउली सायकर आदी उपस्थित होते.


गृहमंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसह आरपीआयचे रामदास आठवले यांच्यावरदेखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने माढा व पंढरपूर या ठिकाणाहून खासदार केले, त्यांचे आडनाव आठवले असूनही ते हे विसरले. शिवसेनेचा मराठवाड्याच्या नामांतरास विरोध होता, हेही ते विसरले. नागपूरच्या चैत्यभूमीऐवजी रेशीमबागेत ते नतमस्तक झाले. या वेळची लोकसभा निवडणूक ही वेगळी आहे. देश एकसंघ ठेवणार्‍यांच्या हाती सत्ता द्यायची की विभाजन करणार्‍यांच्या हाती द्यायचा हे जनतेने ठरवावे. देश महात्मा गांधींच्या की नथुराम गोडसेच्या ताब्यात द्यायचा याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.
राज्यात मोदींची हवा नाही. भाजपला कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, माढा, बारामतीसह अनेक जागा इतरांना घेऊन लढवाव्या लागत आहेत. मग हवा कोठे गेली? मोदी राम-कृष्णापेक्षा मोठे झाले आहेत का? गुजरातपेक्षा महाराष्ट्राचा विकास जास्त झाला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.


आमदार पाचपुते म्हणाले, देशात मोदींचे सरकार आले, तर अनागोंदी माजेल. विकास खुंटेल. या वेळी पिचड, फाळके, भोसले, दादासाहेब कानगुडे, बबनराव नेवसे, तात्या ढेरे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश दिवटे यांनी, तर आभार नानासाहेब निकत यांनी मानले.


जो पत्नीला सांभाळू शकत नाही, तो देश कसा सांभाळणार?
स्वत:च्या पत्नीला लग्नानंतर ज्याने तीन महिन्यांत वार्‍यावर सोडून दिले, अनेक निवडणुकांमध्ये पत्नीचा कॉलम कोरा ठेवला. या वेळी मात्र पत्नी असल्याचा उल्लेख केला, ते मोदी देशाची फसवणूक करत आहेत. हा स्त्री जातीचा अवमान आहे. जो पत्नीला सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? अशी टीका पाटील यांनी मोदी यांच्यावर आपल्या भाषणात केली.