आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांशी जुळलं होतं लक्ष्मण यांचं नातं, "कॉमन मॅन'च्या जनकाच्या आठवणींना उजाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आर.के. लक्ष्मण व्यंगचित्रकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच माणूस म्हणून त्यांचे मोठेपण नगरच्या कलावंतांनी अनुभवले. ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे, शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आर. के. लक्ष्मण यांची आठवण सांगताना चित्रकार अंभोर म्हणाले, १९८३ मध्ये फाय फाउंडेशनचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी इचलकरंजीला गेलो, तेव्हा आर. के. लक्ष्मण यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला. त्यांनाही पुरस्कार होता. आम्ही एकाच रांगेत होतो, पण तेव्हा त्यांच्याशी बोलण्याचं धाडस झालं नाही. निघताना मात्र "माझी चित्रं आपल्याला दाखवायची आहेत', असं मी म्हणालो. त्यावर ते "डू कम' एवढंच म्हणाले. मी त्यांना ग्रीटिंग्ज पाठवायचो. त्यावर माझी चित्रं असायची. त्यांचं कार्ड यायचं - "आय रिमेंबर यू...'. खाली त्यांची स्वाक्षरी असे.

पुढे लक्ष्मण यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला, तेव्हा खास त्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेलो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वास्तूत सकाळी साडेअकराला पोहोचलो, तेव्हा समजलं दुपारी तीनपर्यंत ते व्यंगचित्र काढण्यात मग्न असतात. त्याआधी ते कुणालाही भेटत नाहीत. शेवटी फाय फाउंडेशनचा संदर्भ देऊन चिठ्ठी पाठवली. मग त्यांनी भेटायला बोलावलं. "चित्रं कुठं आहेत?', त्यांनी विचारलं. नेमकी चित्रं मी नेली नव्हती. त्यांनी चित्रं घेऊन पुन्हा भेटायला ये असं सांगितलं. निघताना त्यांनी ऑफिसमधील माणसाला बोलावून चिठ्ठी दिली आणि आम्हाला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा, असं सांगितलं. आर. के. लक्ष्मण यांचे पाहुणे म्हणून सगळे आमच्याकडे आदरानं बघत होते. ही मंडळी लांबून आली आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायला हवी, हे अगत्य दाखवायला कामाच्या इतक्या गडबडीतही ते विसरले नाहीत...

टपाल तिकिटांतून जपली आठवण
आर.के. लक्ष्मण यांचा सन्मान करणारी तिकिटे टपाल खात्याने काढली आहेत. ही तिकिटे जामखेड येथील पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहात आहेत. पुण्यात २०१२ मध्ये झालेल्या महापेक्समध्ये आर. के. लक्ष्मण यांचा "कॉमन मॅन' विशेष टपाल आवरणावर झळकला. टाइम्स ऑफ इंडियाला १५० १७५ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा प्रथम दिवस आवरणांवर कॉमन मॅन होता. काही बोलता हा कॉमन मॅन बरंच काही सांगून जातो...