आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दिला रब्बी पिकांना दिलासा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अखेरच्या घटका मोजत असलेल्या रब्बी पिकांना कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. उशिरा व कमी बरसलेला मान्सून, तसेच परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बीच्या आतापर्यंत केवळ ४३ टक्के पेरण्या होऊ शकल्या. एकूण सरासरीच्या ७७ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

रब्बी हंगामाचे जिल्ह्यात सुमारे ७ लाख ८७ हजार ९४० हेक्टर क्षेत्र आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने ताण दिल्याने रब्बी हंगामातील पेरण्याचा वेग मंदावला. आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. रब्बी हंगामात ज्वारीचे पेरणीक्षेत्र इतर पिकांच्या तुलनेत अधिक आहे. रब्बी ज्वारीचे जवळपास ५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात आहे. ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपला असून यावर्षी केवळ २ लाख ९७ हजार क्षेक्टर क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्र यंदा ४२ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी उत्पादनात पन्नास टक्क्याने घट येण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात ज्वारीपाठोपाठ गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र, गहू पेरणीला अजूनही वेग आलेला नाही. गव्हाच्या एकूण १ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली आहे. केवळ साडेपाच टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी होऊ शकली आहे. रब्बी पिकांसाठी आवर्तन सुरू झाल्याने घोड, कुकडी, मुळा, भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान गव्हाची पेरणी होणार आहे. यातून गव्हाचे पेरणीक्षेत्र वाढणे, अपेक्षित आहे. हरभरा पिकाचे जिल्ह्यात ९८ हजार २३० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. परंतु अवघ्या २३ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होऊ शकली आहे. अवघ्या २३ टक्के क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली असून बागायती क्षेत्रात पेरणी होऊन क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. १५ डिसेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी होते. मक्याच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र जिल्ह्यात १२ हजार ६२० हेक्टर आहे. मक्याची ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून बागायती भागात आणखी पेरणी सुरू आहे. यातून जिल्ह्यातील मका पिकाखालील क्षेत्र वाढणार आहे.

मान्सूनचा पावसाने जिल्ह्यात एक महिन्याच्या विलंबाने समाधानकारक हजेरी लावली होती. जिल्ह्यात विस्कळीत स्वरूपाचा पाऊस असून सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊस पारनेर तालुक्यात झाला आहे. अकोले तालुक्यात सरासरी ओलांडून १४९ टक्के पाऊस झाला. पारनेर तालुक्यात सरासरीच्या अवघा ३७ टक्के पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यातही पावसाने सरासरी ओलांडली आहे. उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये ६० ते ९० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रब्बीच्या पिकांना दिलासा मिळाला.

खरिपाचे उत्पादन घटले
खरीप हंगामात जिल्ह्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांची लागवड करण्यात आली आहे. पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ताण दिल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. बाजरीची लागवड ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. पावसाअभावी बाजरीच्या उत्पादनात घट आली आहे. जवळपास ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. पावसाने ताण दिल्याने हेक्टरी सरासरी साडेपाच ते सहा क्विंटल उत्पादनाचा अंदाज आहे.

उसाच्या क्षेत्रातही घट
उसाच्या लागवडीखालील क्षेत्रातही घट येण्याची शक्यता आहे. ऊस लागवडीखालील सरासरी १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. चाऱ्यासाठी उसाचा वापर झाल्याने या वर्षीच्या गाळपासाठी उसाची कमतरता भासण्याचा अंदाज होता. मात्र, पुरेसा ऊस जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूण २२ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली आहे. आणखी दोन कारखान्यांचे गाळप सुरू होणार आहे.