आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rabi Season Will Be 22 Million Metric Tonnes Of Fodder

रब्बी हंगामात २२ लाख मेट्रिक टन चारा मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. हा पाऊस रब्बी हंगामासाठीही दिलासादायक ठरला आहे. रब्बी हंगामात १८ हजार हेक्टर क्षेत्रावर चारापिकांचे नियोजन करण्यात आले असून, २२ लाख मेट्रिक टन चारा या हंगामात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील पावसाचा आढावा जिल्हाधिकारी कवडे यांच्याकडून व्हिडिआे कॉन्फरन्सद्वारे घेतला. चांगला पाऊस झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. झालेला पाऊस, वाढलेले जलस्त्रोत, पिकांची स्थिती, तसेच रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. फडणवीस यांनी भेट दिलेल्या पारनेर, पाथर्डी जामखेड तालुक्यातील गावांमध्ये पडलेल्या पावसाविषयीही चौकशी केली.

नगर जिल्ह्याबरोबरच फडणवीस यांनी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, आैरंगाबाद दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशीही व्हिडिआे कॉन्फरन्सद्वारे पावसाची माहिती जाणून घेतली. नंतर पत्रकारांशी बोलताना कवडे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर जिल्ह्यात पडलेल्या पावसाची वाढलेल्या जलस्त्रोतांची माहिती घेतली. पावसाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे चारा पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे. या पावसाचे जून २०१६ पर्यंत नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेेणे गरजेचे आहे. महात्मा गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) प्रत्येक गावातील ग्रामसभेत जल आराखडा तयार करण्यात येणार आहे. या ग्रामसभेसाठी प्रशासनाच्या वतीने एक विशेष प्रतिनिधी पाठवण्यात येणार आहे. वाद-विवाद बाजूला ठेवून चारा, पेरणी उपलब्ध पाणी याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. या पावसामुळे रब्बी हंगाम दिलासादायक असेल. रब्बी हंगामात १८ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा विकास अभियानांतर्गत चारापिकांचे नियोजन करण्यात आले असून, यातून २२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनीही पेरणीचे विकसित तंत्रज्ञान अंगीकारून शेती करणे आवश्यक आहे. विहिरी जलस्त्रोत वृध्दीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दुष्काळात ५० हजार रुपये खर्च करून बोअरवेल घेतली जाते. मात्र, त्यातील पाणी वाचवण्यासाठी हजार रुपये खर्च करता येत नाहीत का, असा सवाल कवडे यांनी केला. विहीर पुनर्भरणाची कामे स्वखर्चाने किंवा नरेगा अंतर्गंत झाली पाहिजेत. पाण्याचे दीर्घकालीन नियोजन केले, तर जलसंपन्नता येईल. ग्रामसभेमध्ये जलनियोजन पीकपध्दती यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पातील पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी महावितरण, महसूल कृषी विभागाला दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणीचोरीबाबत समजावून सांगूनही परिणाम होत नसेल, तर वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे कवडे म्हणाले.

सहा तालुक्यांतील स्थितीची पाहणी
पालक मंत्रीराम शिंदे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी श्रीगोंदे, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत नगर तालुक्यातील गावांमधील पावसाच्या स्थितीची पाहणी केली. थेट शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी पावसाबाबत चर्चा केली. बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी चिंतामुक्त झाले आहेत.

प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास
गेल्यादोन महिन्यांपासून दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या नगर जिल्ह्याला परतीच्या पावसाने तारले. शेतकऱ्यांबरोबरच प्रशासनावर आलेला दुष्काळाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परतीच्या पावसामुळे राज्य सरकारही दुष्काळातून सुटल्याचे चित्र दिसत आहे.