आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साफसफाई नाही, आम्ही होलसेल धुलाई करतो - राधाकृष्ण विखे पाटील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - नगरनंतर आता आमची साफसफाई करण्याची भाषा पालकमंत्री बबनराव पाचपुतेंना शोभत नाही.साफसफाईचा अर्थच त्यांना अद्याप समजलेला दिसत नाही. आम्ही असल्या साफसफाईच्या भानगडीत पडत नाही. थेट होलसेल धुलाईच करतो, अशा आक्रमक शब्दांत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाचपुतेंवर आक्रमक हल्ला चढवला.
तालुका विकास आघाडीचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात अध्यक्षपदावरून विखे यांनी पाचपुतेंवर टीकेची तोफ डागली. या वेळी बाळासाहेब नाहटा, तुकाराम दरेकर, अण्णासाहेब शेलार, डी. एम. भालेराव, कैलास पाचपुते, सिद्धेश्वर देशमुख यांच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावरील सर्वच नेत्यांनी पाचपुतेंवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने विखे यांनीही अत्यंत जहरी टीका केली. ते म्हणाले, ‘‘कुकडीचे हक्काचे पाणी अडवणा-या पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात मंत्रिपद टिकवण्यासाठी पाचपुते बोलत नाहीत. त्यामुळे श्रीगोंद्याची वाट लागली आहे. कर्जत भकास होताना जामखेडचेही वाटोळे झाले. स्वत:चे खासगी कारखाने काढले. आमचा या कारखानदारीला विरोध नाही; पण ज्यांच्या जिवावर सत्तेचे वैभव भोगता, त्या सामान्य जनतेची या कारखान्यात अजिबात भागीदारी नाही. नागवडे-जगतापांनी आयुष्यभर समाजाची बांधिलकी जपताना सहकार वाढवला; पण त्याच्या वाट्याला कायम फसवणूकच आली. ‘आता देर आये दुरुस्त आये,’ या प्रमाणे ही सगळे प्रमुख काँग्रेसमध्ये आले आहेत.’’
तुम्हाला नेमके कोणते व्हिजन अभिप्रेत आहे, असा सवाल करून विखे म्हणाले, ‘‘पाणी मिळेना. रोजगारीचा प्रश्न सुटेना. औद्योगिक वसाहतीचा प्रश्न राजकारणासाठी तेवत ठेवलाय. हे आजचे प्रश्न जागेवर असताना पुढच्या गप्पा कसल्या मारता? जिल्हा परिषदेला आलेले 24 कोटींचे नाशिक पॅकेज पाचपुतेंनी परत पाठवले. क ारण जर या पॅकेजमुळे विकास झाला असता तर त्याचे श्रेय काँग्रेसला मिळाले असते, याची त्यांना भीती होती.’’
तालुक्याच्या परिवर्तनासाठी ही शेवटची निवडणूक आहे. आता चुकलात की परत संधी नाही, असे उपस्थितांना उद्देशून बोलतानाच त्यांनी, पक्षात तुमचा योग्य सन्मानच होईल; पण आता उद्याची पिढी घडवण्यासाठी तरी एकत्र राहा, असा सल्ला व्यासपीठावरील नेत्यांना दिला.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी ‘तालुक्यातील विकासासाठी झटणारा प्रामाणिक माणूस’, अशा शब्दांत नागवडे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनीही पाचपुतेंवर शरसंधान करताना, श्रीगोंद्यातील बनवाबनवीचे नाटक आता सर्वांच्या लक्षात आले आहे. काँग्रेसने श्रीगोंद्यात केलेल्या कामांचे श्रेय पाचपुते घेतात. आमचा बेत पाहण्याची धमकी देतात; पण त्यापेक्षा श्रीगोंद्यातील दरोडेखोरांचा बेत पाहिला तर चांगले होईल, असा चिमटा काढला. या वेळी आमदार सुधीर तांबे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे, कुंडलिकराव जगताप, भास्करराव डिक्कर, संपतराव म्हस्के, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब गिरमकर आदी उपस्थित होते.
नंतर तुमचे वाटोळेच... - पोलिस अधीक्षकांवर आमचा विश्वास असला तरी पोलिस खात्याचा वापर दुर्दैवाने राजकारणासाठी केला जातोय. खालचे अधिकारी पोलिसांचा वापर कार्यकर्त्यांना वेठीस धरण्यासाठी करत आहेत, असा आरोप पोलिस यंत्रणेवर करून विखे यांनी, सत्ता आयुष्यभर नसते, नंतर तुमचेही वाटोळेच आहे, असा सज्जड दम विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना उद्देशून दिला.
आदिवासी विभागात घोटाळा - आमच्यावर टीका करताना बबनराव पाचपुते यांनी भान ठेवले पाहिजे, असे सांगत कृषीमंत्री विखे यांनी आदिवासी विभागातील गैरकारभारावर बोट ठेवले. आदिवासी मुलांचे कसे शोषण केले जाते, याची वेळ आल्यावर पुराव्यानिशी बोलू. त्या वेळी पाचपुतेंना भोवळ तर येईलच; पण त्यांच्या खात्याची लक्तरेही वेशीवर टांगली जातील, असा विखे यांनी गौप्यस्फोट केला.