आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना म्हणजे सत्तेसाठी लाचारी पत्करलेला शेषनाग -राधाकृष्ण विखे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘राज्य सरकारला मराठा समाजास आरक्षण द्यावेच लागेल. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत तयार करण्यात येणाऱ्या मंत्रिगटात सहभागी होण्यास मला सांगण्यात आले. परंतु हा अधिकार मराठा मोर्चाच्या आयोजन समितीचा आहे. जोपर्यंत समिती सांगत नाही तोपर्यंत मला अधिकार नाही. अायोजन समितीने राजीनामे देण्यास सांगितले, तर आम्ही सर्व मराठा अामदार राजीनामे देऊ,’ असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

‘मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्रिगट हवेच कशाला? साधी चर्चा करण्याचीदेखील गरज नाही. राज्यभर समाजाचे मोर्चे निघत आहेत, मागण्यांची निवेदने सरकारपर्यंत पोहोचली आहेत, तरी सरकार निर्णय घेण्यात वेळकाढूपणा करत आहे. मराठा मोर्चाच्या आयोजनासाठी समिती आहे. या समितीमार्फत सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळे सरकारने मंत्रिगटात सहभागी होण्यासाठी बोलावले होते, परंतु मला त्याचा अधिकारच नाही. जोपर्यंत आयोजन समिती आम्हाला सांगत नाही, तोपर्यंत आम्हाला पुढे होण्याचा अधिकार नाही. आयोजन समितीने सांगितल्यास आम्ही मराठा आमदार राजीनामे देखील देऊ,’ असे विखे यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजाला मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. या समाजाने मराठा आरक्षणाबाबत चिंता करण्याची गरज नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी सरकार घेईल. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार आहे, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ओबीसी मोर्चाचेही विखे यांनी समर्थन केले. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही बरोबर काम केले अाहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना हा लाचारी पत्करलेला शेषनाग
शिवसेनेने विखे यांना गांडुळाची उपमा दिली हाेती. त्याला उत्तर देताना विखे म्हणाले, ‘गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. शिवसेनेला मात्र ते कळणार नाही. शिवसेना म्हणजे सत्तेसाठी लाचारी पत्करलेला शेषनाग आहे. जनाधार संपत चालला म्हणून त्यांनी मराठा समाजाची माफी मागितली. अन्यथा या नेत्यांना राज्यात फिरू दिले नसते. शिवसेनेचा माफीनामा म्हणजे उशिरा सूचलेले शहाणपण आहे. दसरा मेळाव्याची भीती वाटली म्हणून माफी मागितली, परंतु ‘बूंद से गयी...’ असा टाेलाही विखे यांनी लगावला.

भव्य मोर्चाने बदलली सेनेची भूमिका : राणे
‘राज्यात निघणारे मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे बघून पायाखालची वाळू सरकल्यानेच शिवसेनेने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला अाहे,’ अशी टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी केली. मराठा आरक्षणाच्या निर्णयापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने जेव्हा राणे समिती नेमली होती, तेव्हाही शिवसेनेने मराठा आरक्षणाला विरोधच केला होता, असेही ते म्हणाले. मनसेने अारक्षणाविषयक जाहीर केलेल्या भूमिकेला काेण विचारताे? असेही ते म्हणाले. सिंधुदूर्ग येथील मराठा मोर्चात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...