आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी पाणीवाटपातील त्रुटी दूर करण्याची गरज, राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समन्यायी पाणी वाटपासंदर्भात २००५ मध्ये कायदा झाला, पण या कायद्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याने नगर जिल्ह्यावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या कायद्यातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. कोकणातले पाणी वळवण्यासंदर्भातही प्रयत्न होण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मंगळवारी विखे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. सहकार सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप, राहुल जगताप, भाऊसाहेब कांबळे, विजय औटी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नंदकुमार झावरे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन पहावे लागेल. एखादा पक्ष सत्तेत येतो, दुसरा विरोधात राहतो. अशा घटना लोकशाहीत घडत असतात. अनेक चढउतार मी पाहिले आहेत. पक्षीय पातळीवर काही बाबीत मतभेद होत असतील, पण मी कोणाशी कटुता घेतली नाही. या मंचावर सर्वपक्षीय एकत्र आल्याने जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल.

जिल्हा विभाजनामुळे ठरावीक लोकांचे समाधान होईल, पण यापेक्षाही इतर महत्त्वाचे प्रश्न आहेत. जिल्हा सध्या पाण्याची वाट पाहतोय. जनतेची सहनशीलता आता संपली आहे. भविष्यात पाणी देण्यासाठी काय करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. समन्यायी पाणी वाटपासंदर्भात कायदा झाला, पण या कायद्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे सातत्याने जिल्ह्यावर अन्याय झाला. हा कायदा रद्द करावा, असे मी म्हणणार नाही, पण कायद्यातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. कोकणातले पाणी गोदावरी खोऱ्यात आणावे लागेल. ही बाब खर्चिक असली, तरी समुद्रात वाहून जाणारे ८२ टीएमसी पाणी आपल्याला वाचवता येईल. वैनगंगेचे १६ टीएमसी पाणी गोदावरीत आणता येईल. नगरचा भुईकोट किल्ला महत्त्वाचा असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याचा पर्यटनविकास होणे गरजेचे आहे, असेही विखे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, जिल्ह्याला राजकारणविरहित पुढे न्यायचे असेल, तर सर्वपक्षीय एकमत हवे. जिल्हा विभाजनाचा प्रश्न चिघळला आहे. पण कोणीही पुढे येत नाही. कारण वाईटपणा स्वीकारायला कोणी तयार होत नाही. जिल्हा विभाजनासाठी राजकीय मतैक्य असायला हवे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघरची निर्मिती झाली. कारण तेथील वातावरण नव्या जिल्‍ह्याच्या निर्मितीला अनुकूल होते.
राज्यात सत्ता स्थापन होत असताना विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली होती. पण स्थित्यंतरानंतर त्यात बदल झाला. आता विधिमंडळाचे दुसरे अधिवेशन मार्चमध्ये होणार आहे आणि विरोधी पक्षनेतेपदी विखे आहेत. ऐनवेळी गुगली टाकण्याची विखे यांची ख्याती आहे. त्यामुळे बदल होऊ शकतो. माझा हा रिपोर्ट खरा आहे, असे सांगत पालकमंत्री राम शिंदे यांनी विखे भाजपत येणार असल्याचे संकेत दिले.
व्यासपीठावर रंगली नेत्यांची जुगलबंदी
आमदारविजय औटी म्हणाले, विखेंना हे पद सहजासहजी मिळाले नाही. मागील लोकसभेत कर्डिले राष्ट्रवादीकडून होते. ते भाजपमध्ये येऊन आमदार झाले. तसेच राजळेंबाबतही झाले. असा उदारमतवादी भाजप पक्ष आहे. यावर आमदार कर्डिले म्हणाले, औटी सेनेत कंटाळले असतील, तर त्यांनी लोकसभा लढवावी आणि लोकसभेत पराभूत झाले, तर त्यांनी भाजपमध्ये येऊन आमदार व्हावे. जयंत ससाणे म्हणाले, कर्डिलेंचा मोठा अभ्यास आहे. त्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर झाल्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. विखे म्हणाले, मी कर्डिले शशिकांत गाडे यांच्या भावनांविषयी बोलणार नाही. प्रत्येकाला बोलण्याचे समाधान असते... ते मला हिरावून घ्यायचे नाही...